मुंबई : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यातील पात्रता गुणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अल्प घट झाली होती. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये पात्रता गुणांमध्ये घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र दुसऱ्या यादीत मुंबईतील काही नामांकित महाविद्यालयांमध्ये पात्रता गुणांमध्ये घसरण होण्याऐवजी वाढ झाल्याने विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

दुसऱ्या फेरीसाठी १ लाख ४६ हजार ८२७ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी ७१ हजार ८९ विद्यार्थ्यांना जागा वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांपैकी २९ हजार ५६९ जणांना त्यांच्या पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. १२ हजार ७४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाची, तर ८ हजार ६०३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाची जागा मिळाली आहे. म्हणजेच जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीक्रमांपैकी एखाद्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळाली आहे. यावरून मुंबई विभागातील दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांचा कल नामांकित महाविद्यालयांकडे असल्याचे अधोरेखित होते.

दुसऱ्या फेरीत जागा मिळालेल्या ७१ हजार ८९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३९ हजार १८७ विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेत, २४ हजार ४१८ विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत आणि केवळ ७ हजार ४८४ विद्यार्थ्यांना कला शाखेत प्रवेश मिळाला आहे. यावरून वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठीची स्पर्धा यंदाही सर्वाधिक तीव्र असल्याचे दिसून येते.

वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये विद्यार्थ्यांची पसंती मोठ्या प्रमाणात असल्याने पात्रता गुणांमध्ये फारशी घट झालेली नाही. पोदार महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा कटऑफ ९४.२ टक्क्यांवरून ९४.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. वझे-केळकर महाविद्यालयातही वाणिज्य शाखेचा कटऑफ ९२.४ वरून ९३.४ टक्क्यांपर्यंत वाढला. एचआर, एनएम, एमसीसी, डहाणूकर, रुईया, सेंट झेविअर्स यांसारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये कटऑफ अजूनही ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीतही उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाच वरचष्मा दिसून आला.

कला शाखेत कटऑफ मोठ्या प्रमाणात खाली येण्याची विद्यार्थ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. जय हिंदमध्ये कला शाखेचा कटऑफ ८९ वरून ८८.८ टक्क्यांवर, रुईयामध्ये ९१.८ वरून ९१.४ टक्क्यांवर, तर वझे-केळकरमध्ये ८९.४ वरून ८९.२ टक्क्यांवर आला आहे. काही महाविद्यालयांमध्ये तर कटऑफ जवळपास स्थिरच राहिला आहे. विज्ञान शाखेतही रुईया, रुपारेल, सेंट झेविअर्स, के. जे. सोमय्या, बांदोडकर यांसारख्या महाविद्यालयांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुणांची मागणी कायम आहे. त्यामुळे विज्ञान शाखेसाठीची स्पर्धा अजूनही तीव्र आहे.

पुढील यादीत मोठी घसरण होईल, अशी अपेक्षा असलेल्यांना फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिक फेऱ्यांची वाट न पाहता मिळालेल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या महाविद्यालयांचा पहिल्या यादीचा व दुसऱ्या यादीचा कटऑफ तुलना

कॉलेजपहिली यादी – आर्ट्सपहिली यादी – कॉमर्सपहिली यादी – सायन्सदुसरी यादी – आर्ट्सदुसरी यादी – कॉमर्सदुसरी यादी – सायन्स
एचआरशाखा नाही९३शाखा नाहीशाखा नाही९३.३शाखा नाही
जय हिंद८९९२.२८९.४८८.८९१.८८८.८
सेंट झेविअर्स९२.६९०.४९२.२९२.६८९.८९१.६
विल्सन८२.४८७.२८६.६८१.८८६.६८५.२
कीर्ती६९.८७९.८८१.८६५७७.६७८.८
रुपारेल८७.६९१.४९१.६८६.६९१.२९०.८
रुईया९१.८शाखा नाही९३.२९१.४शाखा नाही९३
पोदारशाखा नाही९४.२शाखा नाहीशाखा नाही९४.४शाखा नाही
झुनझुनवाला६९.६८५.८८७६६८४.८८६.२
के. जे. सोमय्या विज्ञान व वाणिज्यशाखा नाही८९.८९०.८शाखा नाही८९.२९०.६
के. जे. सोमय्या कला व वाणिज्य८६८९शाखा नाही८५.६८९शाखा नाही
वझे-केळकर८९.४९२.४९२.८८९.२९३.४९२.२
एमसीसीशाखा नाही९२.२शाखा नाहीशाखा नाही९२.२शाखा नाही
भवन्स अंधेरी८४.४८९.८९०.४८४.६८९.६८९.८
एनएमशाखा नाही९३.६शाखा नाहीशाखा नाही९३.४शाखा नाही
डहाणूकरशाखा नाही९१शाखा नाहीशाखा नाही९१शाखा नाही
साठये८१.८८९.६८९.४८१८९.२८८.६
बांदोडकरशाखा नाहीशाखा नाही९२शाखा नाहीशाखा नाही९१.६
जोशी-बेडेकर८३८९.४शाखा नाही८४.२८९.२शाखा नाही
सीएचएम६०.८८४.६८९.२६७.४८४.२८९.२
मिठीबाई८५९१.६८८.२८६.६९१.६८७.६
बिर्ला कॉलेज९२९०.६९३.२८९.६९१९३