मुंबई : गणेशोत्सवानिमित्त गेले १२ दिवस षोडशोपचार पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी मुंबईमधील समस्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गुलालाची उधळण करीत, ढोल-ताशा, टोल वाद्यांच्या तालावर थिरकत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करीत गणपतीला गिरगाव, दादर, जुहू चौपाटीसह अनेक ठिकाणच्या विसर्जनस्थळी निरोप दिला. मुंबईमध्ये तब्बल २४ तासांहून अधिक काळ विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. बंदी घातलेल्या टोल वाद्यांच्या कानठळ्या बसविणाऱ्या निनादात, तर काही ठिकाणी डीजेवर थरकत विसर्जन मिरवणुका विसर्जनस्थळी मार्गस्थ होत होत्या. न्यायालयाच्या आदेशांचा भंग होत असताना पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत होते.

मुंबईमध्ये सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यापैकी बहुसंख्य मंडळांच्या गणपतीला अनंत चतुर्दशीच्या दिवसी फटाक्यांची आतशबादी, गुलालांची उधळण करीत ढोल-ताशाच्या गजरात निरोप देण्यात येतो. मात्र गणेश आगमन – विसर्जन मिरवणुकांच्या माध्यमातून होणारे ध्वनी आणि वायू

प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवासह सर्वधर्मीय उत्सव आणि मिरवणुकांमध्ये ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांसह रस्त्यांवर फटाक्यांची आतशबाजी, डीजे, लेझर लाईटस्, बीम्सच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलीस कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी (शुक्रवारी) सकाळी ७ च्या कुमारास लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘मुंबईच्या राजा’च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू लालबाग, परळ, गिरगावसह उपनगरांतील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. मात्र ‘लालबागचा राजा’ मंडई परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर येईपर्यंत दुपार झाली आणि तोपर्यंत लालबाग, परळ भागातील विविध मंडळांच्या गणेशमूर्ती खोळंबल्या. काही वेळानंतर या सर्व गणेशमूर्ती गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. दरम्यानच्या काळात ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. गिरगाव, दादर, जुहू, गोराई आदी ठिकाणच्या चौपाट्या आणि अन्य विसर्जनस्थळाच्या दिशेने वाजत गाजत निघाल्या. मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या टोल वाद्यांचा (बीम्स) घणघणाट करीत, ढोल – ताशाच्या गजरात मिरवणुका मार्गस्थ होत होत्या. मात्र पोलिसांकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात होती. मात्र काही गणेशोत्सव मंडळांनी न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन स्वत:हून बंदी असलेल्या वाद्यांना, तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीला सोडचिठ्ठी देत मिरवणुका मार्गस्थ केल्या.

‘लालबागचा राजा’मुळे खोळंबलेली गणेशगल्लीतील ‘मुंबईचा राजा’ची २२ फूट उंच मूर्ती रात्री ९ च्या सुमारास गिरगाव चौपाटीत दाखल झाला. यंदा ९९ वे वर्ष साजरे करणाऱ्या या मंडळाने पहिल्यांदाच बार्जवरून गणेशमूर्तीचे विसर्जन केले. दरम्यानच्या काळात मुंबईतील मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास मंडपातून मार्गस्थ झालेल्या ‘लालबागचा राजा’ शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास गिरगाव चौपाटील दाखल झाला. समुद्राला ओहोटी असल्यामुळे शनिवारी सकाळी ११ नंतर ‘लालबागचा राजा’चे विसर्जन झाले. त्यानंतर उमरखाडी, डोंगरी, गिरगाव, फोर्ट परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. मुंबईत तब्बल २४ तासांहून अधिक काळ विसर्जन मिरवणूक सुरू होती.