मुंबई : गणपती विसर्जनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण आणि वायू प्रदूषणासंबंधी दिलेले आदेश सरसकट पायदळी तुडवल्याचे शुक्रवारी दिसून आले. आदेशाविषयी सार्वजनिक गणेश मंडळामध्ये असलेला संभ्रम आणि प्रशासकीय पातळीवर आदेशाच्या अंमलबजावणीबाबत असलेला अभाव यामुळे मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्यांचा दणदणात, फटाक्यांची आतिषबाजी दिसून आली. त्यामुळे मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणूक यंदाही कानठळ्या बसवणारीच ठरली. आवाजाची सार्वधिक पातळी वांद्रे आणि वरळी येथे होती.
यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुण्यासह राज्यात गाजला. मुंबईत मोठ्या संख्येने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून शुक्रवारी अनेक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी शहरासह उपनगरातील अनेक विसर्जन मार्गांवर सार्वजनिक मंडळाकडून ध्वनी प्रदूषणाबाबत असलेल्या नियमांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाबाबतच्या पूर्वीपासूनच लागू असलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी, रस्त्यावर फटाके वाजवण्यास बंदी, अनामत रक्कमेच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक कानठळ्या बसवणारीच ठरली.
गेणेशोत्सवात मुक्त वातावरण असते आणि अशा वेळी ध्वनी प्रदूषणाचा परिणाम अधिक तीव्रतेने होतो. आवाजाची पातळी ७० डेसिबलपेक्षा अधिक असल्यास त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो. दरम्यान, यावर्षी अनेक मंडळाकडून ध्वनीक्षेपक आणि डीजेचा वापर टाळण्यात आला, असे निरीक्षण मागील अनेक वर्षांपासून मुंबई शहर आणि उपनगरात गणेशोत्सव काळात आवाजाची पातळी मोजणाऱ्या ‘आवाज फाऊंडेशन’ या संस्थेने नोंदविले आहे. मात्र, राजकीय पक्षांकडून गिरगाव चौपाटी परिसरात उभारण्यात आलेल्या केंद्रावर ध्वनीची पातळी १०३ डेसिबलपर्यंत पोहोचली होती असे निरीक्षणही नोंदविले असून मध्यरात्रीदेखील रात्री १२:३० पर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करून ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केले, असे आवाज फाऊंडेशकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.
वांद्रे आणि वरळीत आवाजाची सर्वाधिक पातळी
यावर्षी वांद्रे पश्चिम ( १०७.८ डेसिबल) आणि वरळी येथे ( १०७ डेसिबल) रात्री १० च्या सुमारास सर्वाधिक आवाजाची पातळी नोंदली गेली. वांद्रे पश्चिम येथे ध्वनीक्षेपक आणि बँजोच्या, तर वरळी येथे ढोल-ताशांचा आवाज होता, असे निरीक्षण आवाज फाऊंडेशनने नोंदवले आहे. तसेच गिरगाव चौपाटीवर रात्री ११:१५ च्या सुमारास आवाजाची पातळी ९२-१०३ डेसिबल दरम्यान होती. यात दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत राजकीय पक्षांकडून ध्वनीक्षेपकाचा वापर केला गेला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यावर्षी बहुतांश मिरवणुकांमध्ये ध्वनीक्षेपकाचा वापर केला नाही, असे आवाज फाऊंडेशनचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी मुसळधार पावसामुळे आवाजाची पातळी संस्थेकडून मोजण्यात आली नव्हती. आवाजाची सर्वाधिक पातळी २०२४ मध्ये ११५ डेसिबल, २०२३ मध्ये ११४.७ डेसिबल, २०२२ मध्ये १२०.२ डेसिबल, २०२१ मध्ये ९३.१ डेसिबल, तर २०२० मध्ये १००.७ डेसिबल इतकी नोंदविण्यात आली होती.
यंदाही ध्वनी प्रदूषण अधिक होते. राजकीय पक्षांकडून रात्री १२ नंतरही ध्वनी प्रदूषणाबाबत असणाऱ्या नियमांचे पालन केले गेले नाही. मात्र, बहुतांश मंडळाकडून यंदा ध्वनी प्रदूषणाबाबत असणाऱ्या नियमांचा आदर राखला गेला. ध्वनीप्रदूषणाबाबत आता नागरिकांमध्ये जनजागृती वाढत असून मंडळाकडून ध्वनी प्रदूषणाबाबत काळजी घेतली जाते. राजकीय पक्षांनीही हे सामाजिक भान जपायला हवे.- सुमैरा अब्दुलअली, आवाज फाऊंडेशन
