मंडळांची नरमाईची भूमिका; शासन निर्णयाला पाठिंबा देत उत्सव साजरा करण्याचा निर्णय

नीलेश अडसूळ
मुंबई : गेले काही दिवस रखडलेले गणेशोत्सवाचे त्रांगडे हळूहळू सुटताना दिसत आहे. गणेशोत्सवाला अवघे ३८ दिवस राहिलेले असताना निर्बंध शिथिल होण्याची वाट न पाहता मंडळांनी उत्सवाची तयारी सुरू केली आहे. राज्यात आलेल्या महापुरानंतर सरकारवरील ताण वाढल्याने मंडळांनीही नरमाईची भूमिका घेत सरकारला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे, तर आर्थिक बाब दुबळी बनल्यामुळे काही मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

करोनाकहर ओसरत असल्याने गणेशोत्सवातील उंचीबाबतचे निर्बंध शिथिल करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली होती. परंतु राज्य सरकारकडून त्याला कोणतीही दाद मिळाली नाही. त्यात कोकण प्रांतासह सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे सरकारपुढील आव्हाने अधिक वाढली. एकीकडे राज्यात संकटांची मालिका सुरूअसताना आपण उंचीचा रेटा लावणे योग्य नसल्याची समजुतीची भूमिका घेत मंडळांनी शासन निर्णयाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे, एवढेच नव्हे तर मंडळांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठीही कंबर कसली आहे.

‘उत्सवाला अवघे काही दिवस राहिल्याने आता कसलीही वाट बघण्यात अर्थ नाही. मूर्ती तयार करण्यास वेळ लागत असल्याने आता चार फुटांच्या उंचीलाच पाठिंबा द्यावा लागेल. शिवाय सध्या सरकारचे संपूर्ण लक्ष करोना आणि पूग्रस्तांकडे असल्याने शासन निर्णयानुसार उत्सवाची तयारी सुरू करावी लागेल,’ अशी भूमिका अनेक मोठय़ा मंडळांनी मांडली.

छोटी मंडळे मात्र शासनाकडून निर्णय बदलाची वाट न पाहताच तयारीला लागली आहेत. यंदाही वर्गणी जमवणे कठीण असल्याने या मंडळांपुढे आर्थिक पेच आहेत. मोठा उत्सव करायचा म्हटले तर मूर्ती, मंडप, सजावट, रोषणाई किमान ५ ते १० लाख रुपये खर्च येतो. सध्याच्या परिस्थितीइतके पैसे जमवणे शक्य नसल्याने साधेपणाशिवाय पर्याय नाही,’ अशी छोटय़ा मंडळांची भूमिका आहे.

‘धारावीतील लोकांकडे अजूनही नोकरी, व्यवसायचा प्रश्न गंभीर असल्याने आम्ही वर्गणी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय छोटय़ा मंडळांकडे लाखोंची पुंजी नसते. चार फुटांची मूर्ती, लहानसा मंडप उभारण्यासाठी ५० हजार ते एक लाख रुपये खर्च होतात. सध्या कार्यकर्ते मिळून या पैशाची जुळवाजुळव करत आहोत. हे वर्ष पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचा आमचा मानस आहे,’ असे धारावीतील शिवशक्ती सेवा मंडळाचे सचिव रवींद्र डमरे यांनी सांगितले.

यंदाही चांदीचा ‘चिंतामणी’

मुंबईतील मानाचा समजला जाणारा ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ यंदाही चांदीच्या मूर्तीरूपात दिसणार आहे. ‘उंचीसाठी आपण बरेच प्रयत्न केले. परंतु आता त्यावर निर्णय होईल असे दिसत नाही. शिवाय राज्यात आलेले पूरसंकट पाहता सामाजिक अंगाने विचार करायला हवा. आम्ही गेले काही दिवस पूरग्रस्तांच्या मदतीसाठीच कार्य करत आहोत, त्या पार्श्वभूमीवर उत्सवही साधेपणानेच होईल. मंडळाच्या देव्हाऱ्यातील परंपरागत चांदीच्या गणेशमूर्तीची स्थापना करून यंदाचा उत्सव होईल,’ असे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी सांगितले.