मुंबई : गणेशोत्सवाला अवघा एक महिना शिल्लक असून काही दिवसांतच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी ज्या पद्धतीने वाहतूक व्यवस्था केली जाते, त्याच धर्तीवर आगमनाच्या दिवसाचेही नियोजन करावे, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबई पोलिसांकडे केली आहे.

यंदा १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाला अवघा एक महिना शिल्लक असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनाच्या वाहतूक नियोजनाबाबत समन्वय समितीने पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यांना निवेदन देऊन वाहतूक व्यवस्थेबाबत काही सूचना केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव आणि दादर चौपाटीकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर एकेरी वाहतूक करून दुसरी बाजू गणेश विसर्जनासाठी राखीव ठेवली जाते. अशाच प्रकारचे नियोजन गणेशमूर्ती आगमनाच्या दिवसांमध्ये केल्यास शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात टाळता येईल, असे समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर आणि प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

– दादर, लालबाग, परळ आदी भागांतील गणेश कार्यशाळांमधून पुढील दोन आठवड्यांत हजारो मूर्ती विविध मंडळे आणि सोसायट्यांकडे रवाना होणार आहेत. या परिसरात एकेरी वाहतूक आणि स्वतंत्र मार्ग नियोजन केल्यास मिरवणुकांचा मार्ग सुरळीत होईल, रस्त्यांवरील अडथळे कमी होतील आणि वाहनचालकांनाही दिलासा मिळेल.

– समितीने वाहतूक पोलिसांनी महत्त्वाच्या मूर्ती कारखान्यांच्या परिसरात तात्पुरती नो-पार्किंग व्यवस्था करावी, अशीही सूचना केली आहे. मूर्तिकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, वाहतूक पोलीस, मुंबई पोलीस आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी यांनी समन्वय साधून नियोजन केल्यास कोंडी होणार नाही.

– मिरवणुकीच्या वेळी रुग्णवाहिकांना मार्ग उपलब्ध करून देणे गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक राहील, अशा सूचनाही समन्वय समितीने केल्या आहेत.