ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या जोखडात भारत अडकला होता. कुणी अहिंसेच्या मार्गाने, तर कुणी क्रांतीच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळे देशात मवाळ आणि जहाल असे दोन तट निर्माण झाले होते. मात्र उभयतांचा उद्देश देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हाच होता. समाज जाती-पातींमध्ये विखुरला होता. या बहुजनांना एकत्र आणून स्वातंत्र्यासाठी मोठी चळवळ उभी करण्याचे काही धुरीणांचे प्रयत्न सुरू होते. सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने समाजाला एकत्र आणता येईल हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हेरले आणि समाजात एकोपा, समाज प्रबोधन करण्याच्या उद्देशाने पुण्यात १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केलेल्या आवाहनानुसार गिरगावातील खाडीलकर रोडवरील केशवजी नाईकांच्या चाळींमध्ये १८९३ मध्ये मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेल्या केशवजी नाईकांच्या चाळींतील काही मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर पुण्या-मुंबईत ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. समाज प्रबोधनासाठी सभा, व्याख्याने, मेळे, खेळे आदींचे आयोजन सुरू झाले आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने समाज एकवटू लागला. त्यामुळे उत्सव ब्रिटिश सरकारची डोकेदुखी वाढली. सार्वजनिक गणेशोत्सवातील कार्यक्रमांवर ब्रिटिश सरकार बारीक लक्ष ठवू लागले. मात्र तरीही समाज धुरीणांनी गणेशोत्सवात प्रबोधनाची कास सोडली नाही.

देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला आणि हळूहळू गणेशोत्सवाचे रुप बदलू लागले. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांच्या चुकीच्या निर्णयांविरोधात गणेशोत्सव मंडळे उभी राहू लागली. गणेशोत्सवात चलत््चित्राच्या माध्यमातून सरकारच्या डोळ्यात अंजन घातले जात होते. त्याला पौराणिक कथांची जोडही मिळत होती. गणेशोत्सवातील स्थानिक कार्यक्रमांच्या निमित्ताने वक्ते, कलाकार घडू लागले. त्यातूनच पुढे समाजाला चांगले कलाकार मिळाले. गणेशोत्सवात वक्तृत्व स्पर्धा गाजविणारे तरुण कालांतराने राजकारण, समाजकारणात दिसू लागले. मात्र कालौघात समाज प्रबोधनाची आस असलेली मंडळी गणेशोत्सवापासून दूर गेली आणि तरुण पिढी सक्रिय झाली. गणेशोत्सवाचे रुप बदलू लागले. गणेशोत्सवाच्या मंडपात जुगाराचे अड्डे, गणेश आगमन – विसर्जनाच्या मिरवणुकीत मद्यधुंद मंडळी अचकट विचकट नृत्य करून ओंगळवाणे दर्शन घडू लागले. त्यामुळे पुन्हा एकदा काही मंडळी एकत्र आली आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा जन्म झाला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुळ हेतू हरवू नये यासाठी ही मंडळी सक्रिय झाली आणि मंडपातील जुगाराचे अड्डे, मद्यधुंद तरुणांना लगाम बसला. मात्र गणेशोत्सवाचा मुळ हेतूच हरवलाच.

गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येच स्पर्धा सुरू झाली आहे. आपले मंडळ किती मोठे हे परस्परांना दाखविण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने देणगी, जाहिरातींच्या रुपात कोट्यवधींची माया जमवून केवळ भव्य सजावट, प्लास्टर ऑप पॅरिसची (पीओपी) उंच गणेशमूर्ती, भव्यदिव्य रोषणाई, कर्णकर्कश्य वाद्यांच्या तालावर थिरकत, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत आगमन – विसर्जन मिरवणुका काढण्यात आताची गणेशोत्सव मंडळे धन्यता मानत आहेत. प्रत्येक विभागातील गणेशोत्सव मंडळांतील पदाधिकारी परस्परांचे प्रतिस्पर्धी असल्यासारखे वागू लागले आहेत. समाज प्रबोधनाचा मुद्दा केव्हाच हरवून गेला आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. पण आपले भपकेबाज मोठेपण दाखविण्यात मग्न असलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रदुषणाच्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. पीओपीच्या गणेशमूर्तींचा मुद्दा ऐरणीवर आहे. महाराष्ट्राला खेटून असलेल्या गोव्यासारख्या छोट्या राज्याने वेळीच धोका ओळखून पीओपीवर बंदी घातली. पण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना मात्र आपल्या राज्यात पीओपी बंदी करता आलेली नाही हे खेदाने म्हणावे लागत आहे. देशाच्या पंतप्रधानांनी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती घडविण्याचे आवाहन केले. पण त्यांच्याच पक्षाचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात मात्र पीओपीविरोधातील कठोर निर्णय घेण्यास तयार नाही. गेली काही वर्ष पीओपीचा खेळ सुरू आहे. पीओपीवर बंदी येणार हे माहीत असतानाही मूर्तीकार अट्टाहासाने मूर्ती घडवतात आणि मग त्यांचे नुकसान होऊ नये, आपल्या मतपेढीला धक्का बसू नये म्हणून सरकार नमते घेत आले आहे.

मुळात गणेशोत्सव मंडळे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पर्यावरणीय धोके ओळखून आपल्या कृृतीत बदल करायला हवा. प्रबोधनासाठी सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रदुषणाविरोधात चळवळ उभी करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत ध्वनी, वायूसोबतच प्रकाश प्रदुषणाचाही धोका वाढत आहे. रोषणाईचा लखलखाट त्याला कारणीभूत ठरत आहे. आपण गणेशोत्सवात या तिन्ही प्रकारच्या प्रदुषणात भर घालत आहोत, हे कुणाच्या गावीही नाही. केवळ पीओपीची उंच गणेशमूर्ती, मोठे देखावे, लखलखाट करणारी रोषणाई म्हणजे गणेशोत्सव नव्हे, मूर्ती लहान असली तरी गणेशापुढे नतमस्तक होताना भाविकांच्या मनात तीच भावना असणार आहे. पीओपी मूर्तीची प्रतिष्ठापना करून आपण प्रदुषणाला हातभार लावून पुढच्या पिढ्यांचे नुकसान करतोय का, याचा विचार प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने करायची वेळ आली आहे.

गणेशोत्सव साजरा करताना आर्थबळ मिळावे म्हणून गणेशोत्सव मंडळे विविध बड्या कंपन्यांकडून जाहिराती घेत आली आहेत. यात काही नवे नाही. गेली आनेक वर्षे हे सुरू आहे. या जाहिराती मंडळांच्या स्मरणिकेत, मंडपस्थळी अथवा प्रवेशद्वारांवर झळकत होत्या. त्यांचे दर वेगवेगळे होते. प्रवेशद्वारावर झळकणाऱ्या जाहिरातींमधून मंडळाला बक्कळ उत्पन्न मिळत होते. फारशी वर्गणी जमत नसणाऱ्या मंडळांना या जाहिराती आधार बनत होत्या. तोपर्यंत ठिक होते. परंतु गणेशोत्सवात होणारी गर्दी हेरून काही बड्या कंपन्यांनी बड्या मंडळांना आपलेसे करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा प्रत्यय गेली दोन वर्षे भाविकांना लालबागमध्ये आला. ‘लालबागचा राजा’च्या मंडपापासून आसपासच्या परिसरात अंबानी कुटुंबियांच्या रिलायन्स जिओच्या झळकलेल्या जाहिरातींचे भाविकांना आधी दर्शन होत होते. त्यानंतर तासन््तास रागेत उभे राहून राजाचे दर्शन घडत होते. अंबानी कुटुंबातील सदस्याचे मंडळाच्या कार्यकारिणीतील स्थान अनेक भाविकांच्या मनाला चटका लावून गेले.

आता हाच कित्ता ‘लालबागचा राजा’पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’च्या मंडळाने गिरविला आहे. अदानी समुहाने संपर्क साधल्यानंतर या मंडळाने जाहिरातींसाठी करारच करून टाकला. ‘चिंचपोकळीचा चिंतापणी’च्या मंडपात आता अदानी समुहाच्याच जाहिरातींचे दर्शन घडणार आहे. मग गेली अनेक वर्षे जाहिरात देऊन मंडळाला मदत करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती आता कुठेतरी कोपऱ्यातच दृष्टीस पडतील, असो. परंतु असे कारण्यात काही धोकेही आहेत. कालौघात अशा मंडळावर जाहिरातीदारांचे वर्चस्व वाढण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत. तसे झाले तर आताच्या कार्यकारिणीत पद मिरवणाऱ्यांची भविष्यांत काय अवस्था होईल हे कुणी सांगायची गरज नाही. त्यामुळे काळाची पावले ओळखावी आणि मंडळांनी निर्णय घ्यावा अन्यथा कुठे नेऊन ठेवलाय गणेशोत्सव असे म्हणण्याची वेळ येईल.