मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी इंग्रजी ‘एल’ आकाराचे सिग्नलचे खांब व संरचना बसविण्यात आली आहे. मुंबईतील गणेशमूर्तींची उंची लक्षात घेता अशा सिग्नल रचनेमुळे गणपती मिरवणुकांना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मार्गांची आगाऊ पाहणी करून आवश्यक त्या संरचना तात्पुरत्या स्वरूपात हटविणे वा योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी गणेशोत्सव समितीने सह पोलिस आयुक्त (वाहतूक) यांना पत्र लिहून केली आहे.
पुढील महिन्यात १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाला अवघा एक महिना शिल्लक असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन १५ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. आगमन मिरवणुकीच्यावेळी शहर व उपनगरातील मंडळांना येणाऱ्या वाहतूक विषयक अडचणी व धोकादायक बाबींची माहिती गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळांकडून मागवली होती. त्यात ‘एल’ आकाराच्या वाहतूक सिग्नलबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची विनंती समन्वय समितीने वाहतूक विभागाचे सह पोलिस आयुक्त सत्यनारायण यांना केली आहे. रस्त्यांवरील अनावश्यक गतीरोधक तसेच केबलच्या वायरी यामुळे मिरवणुकीस अडथळा निर्माण होतो. मागील वर्षी विसर्जनावेळी केबल दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने याबाबत विशेष खबरदारी घेऊन सर्व धोकादायक केबल व्यवस्थित उंचीवर व सुरक्षित पद्धतीने बांधण्यात याव्यात.
अन्य सूचना
- घाटकोपर पश्चिम, जागृती नगर मेट्रो जंक्शन येथे वन-वे वाहतूक व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. गणेशोत्सव काळात या ठिकाणी विशेष वाहतूक नियोजन व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. २) मरोळ ते घाटकोपर-अंधेरी-कुर्ला लिंक रोडवर अद्याप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.
आगमन व विसर्जन मिरवणुकीपूर्वी संबंधित यंत्रणेमार्फत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
- मार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग केले जाते. त्यामुळे पवई तलावाकडे विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेश मंडळांना मोठा त्रास होतो. मिरवणूक मार्गावरील अनधिकृत पार्किंग हटवून वाहतूक सुरळीत ठेवावी.
- गणेशोत्सव काळातील वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्यांवरील खड्डे, प्रलंबित झाडांची छाटणी व रस्त्यावरील विद्युत खांबांवरून जाणाऱ्या वायरी/केबल या तीन महत्त्वाच्या बाबी तातडीने सोडविणे आवश्यक आहे. तसेच काही ठिकाणी अनेक महिन्यांपासून उभ्या असलेल्या अनोळखी/बेवारस वाहनांची तपासणी करून ती हटविण्यात यावीत.
