मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात डीजे आणि ध्वनिवर्धकांच्या वापरावरून वाद चिघळला असतानाच मुंबईतही गणेशोत्सवातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. आगमनाच्या मिरवणुकांमध्येच ध्वनिप्रदूषणाची झलक बघायला मिळाली असून इथल्या ध्वनिवर्धकांवरही नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी होऊ लागली आहे.
पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि ध्वनिवर्धक व लेझर बीमच्या अतिवापरावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे, साउंड सिस्टिम आणि पारंपरिक ढोल-ताशांचा वापर हा दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. ध्वनिप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता यंदा नियमांची अंमलबजावणी कठोर केली जावी, अशी मागणी मुंबईकरांकडून होत आहे. काही मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्मींचे आगमन झाले असून या आगमन मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर केलेला दिसत असून त्यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
सामाजिक कार्यकर्ते पिमेंटा गॉडफ्रे यांनी याबाबत सांगितले की, पूर्वी विसर्जन मिरवणुका असायच्या आता आगमनाच्या मिरवणुकाही मोठ्या प्रमाणात होत असून त्यात आवाजाची मर्यादा न पाळता डीजे लावले जातात. सणाचे खूप व्यावसायिकरण झाले आहे. ते थांबले पाहिजे. कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता सरकारने या सगळ्यावर निर्बंध आणले पाहिजे.
दरम्यान, गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले की, यापूर्वी केलेल्या नियमांच्या उल्लंघनामुळे काही मंडळांवर कारवाई झाली होती आणि त्यावेळी प्रकरण मागे घेण्यासाठी समितीने प्रयत्न केले होते. त्यामुळे गेल्या ४-५ वर्षांत मंडळांमध्ये कायदेशीर बाबींची भीती आणि जागरूकता निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये जसा १०-१२ वर्षांपूर्वी पारंपरिक वाद्यांचा कल होता, तो आता मुंबईतही रुजला आहे. मुंबईत सध्या डीजे न वाजवण्याबाबत मंडळांमध्ये पूर्ण कल्पना आहे. केवळ १-२ टक्के अपवादात्मक प्रकरणांमध्ये डीजेचा वापर झाल्यास पोलीस त्वरित कारवाई करून ते बंद पाडतात, असेही दहिबावकर यांनी सांगितले.
‘डीजेवर सरसकट निर्बंध नको’
ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास आमची हरकत नाही; मात्र सणांच्या काळातील डीजे-साऊंड व्यवसायावर सरसकट निर्बंध आणल्यास हजारो व्यावसायिक आणि कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका प्रोफेशनल ऑडिओ लायटिंग असोसिएशनने (पाला) मांडली. या संघटनेचे कमलेश खांडेकर यांनी सांगितले की, साऊंड व्यावसायिकांची प्रमुख कमाई गणेशोत्सवासह विविध सणांमधील कार्यक्रमांवर अवलंबून असते. त्यामुळे या काळात व्यवसाय ठप्प झाल्यास त्याचा परिणाम केवळ साऊंड मालकांवर नव्हे तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांवरही होतो. आम्ही आमच्या सदस्यांना कायदेशीर मर्यादेतच साऊंड सिस्टीम वापरण्याचे आवाहन केले आहे, असे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवात चार दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपकाला परवानगी
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपक लावण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये गणेशोत्सवाचा दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जनाचा दिवस आणि अनंत चतुर्दशीचा दिवस या दिवशीच परवानगी देण्यात आली आहे. मात्र हे चारही दिवस विसर्जनाचे असल्याने मंडळांना स्थानिक कार्यक्रम घेण्यासाठी अजून एक दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची सूट मिळावी अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.
‘डीजे’मुक्तीसाठी पुणेकर एकवटले
पुणे : ‘सण उत्सव आनंद देतात, शिक्षा नाही’, ‘माझे डोळे, माझे कान, माझं हृदय, माझा अधिकार’, अशा घोषणा, फलक आदींच्या माध्यमांतून पुणेकरांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात रविवारी ‘डीजे’मुक्त उत्सवांची मागणी केली. बाजीराव रस्त्यावरही ज्येष्ठ नागरिकांनी ‘डीजे’विरोधात मोर्चा काढला. ‘कोणत्याही धर्माचा सण असो, ‘डीजे’चा कर्णकर्कश आवाज नकोच. त्यासाठी कठोर नियम आणि त्या नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी,’ अशी भूमिका आंदोलक नागरिकांनी मांडली.
