दरवर्षीप्रमाणे यंदाही चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेशाचा उत्सव मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला. मुंबईमधील सुमारे दोन लाख घरगुती आणि १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या उत्साहात गणरायाची षोड्शोपचार पूजा केली, गणेशोत्सवात १२ दिवस-रात्री जागर केला. मात्र, गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्याकडून प्रदूषणाला खतपाणी मिळत असल्याचे भानच कुणाला उरले नव्हते.

गेल्या काही वर्षांमध्ये उत्सवाच्या निमित्ताने ध्वनी, वायू आणि प्रकाश प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. पण, त्याची चिंता आपण का करावी, अशी उत्सवप्रेमींची धारणा दिसते. दरवर्षी हिवाळ्यादरम्यान मुंबईमधील हवेचा दर्जा खालावतो आणि त्याचा सर्वांच्याच आरोग्यावर परिणाम होतो. मग सरकार काही करीत नाही, असा सूर आळविला जातो. मुळात प्रदूषण का वाढते, हवेचा दर्जा का खालावतो याचा साधा विचार उत्सवप्रिय मंडळींना कारावासा वाटत नाही, हे दुर्दैंव.

यंदा गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवासह सर्वधर्मीय उत्सव आणि मिरवणुकांमध्ये ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांसह रस्त्यांवर फटाक्यांची आतषबाजी, डीजे, बीम्सच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले. राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशांची दखल घेऊन तातडीने सर्व गणेशोत्सव मंडळांना यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे वा सूचना देणे अपेक्षित होते, परंतु तसे घडले नाही.

उच्च न्यायालयाच्या आदेशांचा भंग झाल्यास आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून पोलिसांनी आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनंतचतुर्दशीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री उशिरा न्यायालयाच्या आदेशाची प्रत पाठवली. मध्यरात्रीच्या सुमारास न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती पडल्यानंतर मंडळांचे पदाधिकारी तरी काय करणार. आधीच सर्व नियोजन झाले होते, आयत्या वेळी ते रद्द कसे करायचे, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. मग काय, अनंतचतुर्दशीच्या दिवशी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत, ताल-वाद्यांसह ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुका निघाल्या.

एका रांगेत विविध मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुका गिरगाव, दादर, जुहू, गोराई आदी चौपाट्या आणि अन्य विसर्जनस्थळांच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागल्या. विसर्जन मिरवणुकीत भाविकांना कसलेच भान उरले नव्हते. कानठळ्या बसविणाऱ्या वाद्याच्या तालावर, कुणाच्याच आरोग्याची तमा न बाळगता परस्परांवर गुलालाची उधळण करीत पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक बेभान होऊन थिरकत होते. वाटेत मध्येच एखाद्या चौकात गणरायावर ढीगभर गुलाल ओतला जात होता. गुलालाचे कण हवेतून नागरिकांच्या नाका-तोंडात जात होते. आरोग्य बिघडले तरी बेहत्तर, पण सण साजरा झाला पाहिजे असे आगमन-विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकालाच वाटत होते.

गेल्या काही वर्षांमध्ये उत्सव साजरा करण्याच्या परिभाषाच बदलून गेल्या आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजात एकजूट करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. खेळे, मेळे, व्याख्याने, सभांच्या माध्यमातून गणेशोत्सवात प्रबोधन होत होते. परंतु, आता आपल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी व्हावी असेच प्रत्येक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असते. मग त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौज निरनिराळ्या युक्त्या लढवून भाविकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करतात.

मग नवस करण्याची, तो फेडण्याची, चरणस्पर्श, मुखदर्शन अशा वेगवेगळ्या रांगांमध्ये भाविक तिष्ठत राहतात. याच रांगांमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून होणारा उपमर्द, अवमान गिळून भाविक गपगुमान गणेशमूर्तीपर्यंत पोहोचण्याचा आटापिटा करतात. गणेश दर्शन झाल्यानंतर भाविक मंडळी धक्के खात, चेंगराचेंगरीतून वाट काढत घरचा रस्ता धरतात. कितीही कष्ट झाले तरी देवदर्शन झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लपून राहात नाही. रांगेत तासनतास तिष्ठत राहिल्यानंतर होणारा अपमान काही जणांना अजिबात आवडत नाही. परंतु ‘वारी चुकवायची नाही’ म्हणत ही मंडळी पुढील वर्षी पुन्हा रांगेत उभी राहतात.

अगदी न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून, प्रदूषणविषयक नियमांची पायमल्ली करीत गणेशोत्सव साजरा होऊ लागला आहे. आता लवकरच नवरात्रोत्सव येईल, त्यापाठोपाठ दिवळी. नवरात्रोत्सवात नऊ रात्री गरबाचा जागर आणि दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी. म्हणजे पुन्हा प्रदूषणात भर. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईत एक दिवस श्वास घेणेही अवघड होईल, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. तरीही अशाच पद्धतीने उत्सव साजरे करणार का? तुम्ही सारे खरंच मुंबईकर असाल तर नक्की विचार करा, उच्च न्यायालय, सरकारने हे प्रकार थांबविण्याऐवजी तुम्ही-आम्हीच सारासार विचार करून हे थांबवायला हवे. अन्यथा मुंबईही प्रदूषणकारी दिल्लीच्या वाटेने जाईल.

सर्व नियम धाब्यावर

यंदा उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर उत्सवाच्या नावावर केल्या जाणाऱ्या उन्मादातून सुटका होईल असे पर्यावरणप्रेमींना वाटले होते. परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांची अपेक्षा फोल ठरली. ध्वनिप्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मिरवणुका काढण्यात आल्या. धूमधडाक्यात निघालेल्या विसर्जन मिरवणुकांची चौपाट्यांवर सांगता झाली. शेवटची आरती करून समुद्रामध्ये उंच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. परंतु बहुसंख्य मंडळांच्या उंच गणेशमूर्ती अगदी किनाऱ्यालगत जेमतेम गुडघाभर पाण्यात उभ्या होत्या. दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर पाहावणार नाही अशा स्थितीत उंच मूर्ती होत्या. परंतु उत्सव साजरे करणाऱ्यांना त्याचे काहीच वाटत नाही. गणेशोत्सवात गणपतीची षोड्शोपचार पूजा केल्यानंतर त्याचे असे विसर्जन करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनाची नाही, तर मनाची तरी बाळगायला हवी.

prasadraokar@gmail.com