मुंबई : गणेशोत्सवातील ध्वनिक्षेपकांच्या कर्णकर्कश आवाजावरून राज्यभरात वाद सुरू असतानाच, ध्वनी प्रदूषणावर आधुनिक तंत्रज्ञान पर्याय ठरू शकते का, याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून उल्हासनगरमध्ये वैयक्तिक श्रवण यंत्राद्वारे (हेडफोन) ‘सायलेंट कीर्तन’ यशस्वीपणे राबविले जात आहे. त्यामुळे मुंबईतील काही मंडळेही निवासी भागातील आरती, भजन आणि कीर्तनासाठी अशाच प्रयोगाचा विचार करू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगरमधील प्रयोग नेमका काय?
उल्हासनगरमधील अमृतवेला ट्रस्ट गेल्या काही वर्षांपासून पहाटेच्या सत्संगासाठी वायरलेस हेडफोनचा वापर करत आहे. गोल मैदानावर १५ ते २० हजार भाविक उपस्थित असतानाही व्यासपीठावरील कीर्तन एफएम ट्रान्समीटरद्वारे थेट हेडफोनवर ऐकवले जाते. त्यामुळे मैदानात हजारो भाविक एकत्र बसलेले असतात; मात्र परिसरात शांतता अनुभवायला मिळते व रहिवाशांना आवाजाचा त्रास होत नाही.
‘सायलेंट सत्संग’ ही केवळ तांत्रिक कल्पना नाही, तर सामाजिक जबाबदारीची भावना आहे. ध्वनिक्षेपकांऐवजी वायरलेस हेडफोनचा पर्याय स्वीकारला. हजारो भाविक एकाच वेळी सत्संगात सहभागी होतात; मात्र बाहेर शांतता असते. त्यामुळे श्रद्धाही जपली जाते व कायद्याचेही तंतोतंत पालन होते. – होशियार सिंह लबाना, विश्वस्त, अमृतवेला ट्रस्ट
‘तो करतोय, मग मी का नाही?’ या मानसिकतेमुळे आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होईल या भीतीने प्रशासन ठोस कारवाई करण्यास कचरते. समाजाने मोठ्या आवाजाला भक्तीचे प्रतीक मानणे थांबवून शांतता, पर्यावरणाचा विचार करणार्या पर्यायांना स्वीकारण्याची वेळ आली आहे. – पुरुषोत्तम खानचंदानी, सामाजिक कार्यकर्ते
आज आपण डिजिटल युगात जगत आहोत, त्यामुळे ध्वनीप्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक पर्याय स्वीकारण्याची वेळ आली आहे. ध्वनिक्षेपकांऐवजी वैयक्तिक श्रवण तंत्रज्ञानाचा वापर केला, तर लाखो लोक कोणालाही त्रास न देता उत्सवाचा आनंद घेऊ शकतात. – सुमेरा अब्दुलाली, संस्थापक, आवाज फाऊंडेशन
