मुंबईच्या आद्य नागरिकांचे वास्तव्य कोळीवाड्यांसह गावठाणात आजही आहे. परंतु कोळीवाड्याप्रमाणेच गावठाणांचे अस्तित्त्वही धोक्यात आले आहे. सोन्याचा भाव असलेल्या मुंबईत या भूखंडांवर विकासकांची नजर आहे. विकास नियंत्रण नियमावलीत हे भूखंड हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र त्यास अद्याप यश आलेले नाही. हे मूळ रहिवासी आपल्या हक्कांबाबत जागरुक आहेत. मुंबईत ४९ कोळीवाडे आणि सुमारे ११८ गावठणे आहेत. त्यापैकी बहुसंख्य गावठाणे उत्तुंग इमारतींमध्ये दबली गेली आहेत.
गेल्या दोन स्तंभात कोळीवाड्यांच्या सद्यस्थितीचा उल्लेख केला होता. कोळीवाडे आणि गावठाणे ही मुंबईच्या ऐतिहासिक वारशाची प्रतीके आहेत. मुंबईत आजही कोळीवाडे आणि गावठाणे या दोन स्वतंत्र अस्तित्त्व असलेल्या वसाहती शेकडो वर्षांपासून आहेत. परंतु या मूळ रहिवाशांना झोपडीवासीयांचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तो हाणून पाडला गेला. काही गावठणांच्या जागांचा पुनर्विकास झाला आहे. उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्याचाच आधार घेत आणखीही काही गावठणे आपले अस्तित्व पुसण्याच्या तयारीत आहेत तर काही गावठणे आपली ओळख जपण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ढोबळमानाने समुद्रकिनारी असलेल्या कोळी समाजाच्या वसाहतींना कोळीवाडे तर राज्याच्या महसूल नकाशातील गावे आणि त्यातील गावठाणातील रहिवाशी अशी वर्गवारी करता येईल. ब्रिटिशांनी पहिल्यांदा महसूल विभागात गावठाणांचा समावेश केला. जेथे विहिर, तलाव होता तेथे वसलेली गावे म्हणजे गावठाणे. मुंबईत ११८ गावठाणे आहेत. यापैकी अनेक गावठाणे आजही आहेत. ठाण्यात दोन गावठणे आहेत. भिवंडीत ४२, वसई-विरार येथे २८ आणि मीरा भाईंदर परिसरात ११ गावठाणे आजही आहेत. परंतु या गावठाणांना विकास नियंत्रण नियमावली लागू होऊन पुनर्विकासात उत्तुंग इमारती व्हाव्यात, यासाठी विकासक प्रयत्नशील आहेत. अशा वेळी या कोळीवाडे आणि गावठाणांचे महत्त्व समजून घेण्यासाठी अर्बन सेंटर ही संस्था या रहिवाशांच्या मदतीनेच संशोधन करीत आहेत. त्यांच्या मागण्या आहेत की, या कोळीवाडे- गावठाणातील मूळ रहिवाशांच्या संमतीनेच धोरण ठरविण्यात यावे. काही कोळीवाडे आणि गावठाणांना पुरातन इतिहास आहे. तो अबाधित राहावा, असे त्यांचे म्हणणे आहे. माझगावातील म्हातारपाखाडी असो किंवा वांद्रेतील जुनी गावठाणे, आजही तेथे जुन्या मुंबईच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. त्या जपल्या जाव्यात, अशी त्यांची इच्छा आहे. या गावठाणांमध्ये प्रामुख्याने ईस्ट इंडियन नागरिकांचे वास्तव्य असले तरी ते मूळचे कोळी, आगरी, भंडारी होते. ईस्ट इंडिया कंपनीत त्यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर नोकरी मिळविली. विविध पदे भूषविली आणि ते बिरुद त्यांना चिकटले गेले, असे सांगितले जाते. ही गावठाणे आपले अस्तित्त्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंबईच्या विकास आराखड्यात अद्याप कोळीवाडे-गावठणांना स्थान मिळालेले नाही. अद्यापही सीमांकनाच्याच पातळीवरच ते थांबले आहे. अर्थात सीमांकन झाल्याशिवाय कोळीवाडे-गावठणांसाठी नियोजनबद्ध विकास शक्य होणार नाही. परंतु ते कालबद्ध व्हावे आणि या मूळ रहिवाशांच्या मागण्या लक्षात घेऊन या दुर्लक्षित राहिलेल्या परिसराकडे शासनाने पाहण्याची आवश्यकता हे आद्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
१९६० मध्ये या गावठणांच्या हद्दीची मोजणी झाली. महाराष्ट्र महसूल संहिता आणि अधिनियमानुसार दर २० वर्षांनी मोजणी होणे आवश्यक आहे. परंतु १९६३ पासून ती प्रलंबित आहे, यावरुन शासन किती उदासीन आहे याची कल्पना यावी. आजही बकाल कोळीवाडे आणि अरुंद रस्त्यांमध्ये हरविलेली गावठाणे हे मुंबईचे चित्र दिसते. कोळीवाड्यांच्या सीमांकनाला आता सुरुवात झाली आहे. गावठणांबाबत अद्याप हालचाल दिसून येत नाही. कोळीवाड्यांप्रमाणेच गावठाणात अनेकांची मालकी हक्काची घरे आहेत. मुंबईवर पोर्तुगीजांचे राज्य होते तेव्हा या मूळ नागरिकांना मालकी हक्क मिळाला, असे या घडामोडींशी संबंधित अर्बन सेंटरचे संचालक पंकज जोशी सांगतात. या गावठाणांची प्रामुख्याने तीन भागात विभागणी करता येईल. एक आहे ज्यांना आपला पुरातन ऐतिहासिक वारसा जपायचा आहे. दुसरा भाग आहे ज्यांना आपला स्वयंपुनर्विकास हवा आहे तर तिसरा भाग आहे ज्यांना विस्तारीत विकास हवा आहे. कोळीवाडे आणि गावठाणांसाठी स्वतंत्र विकास नियमावली हाच पर्याय आहे. त्यांना झोपडीवासीय म्हणून संबोधू नका, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
मुंबईत कुलाबा, माझगाव, सांताक्रूझ, वांद्रे, अंधेरी, चेंबूर, भांडूप, मढ, मनोरी, मार्वे, गोराई आदी भागात अद्यापही गावठाणे आहेत. माजगावमधील म्हातारपाखाडी, अंधेरीतील आंबोली, सहार, मरोळ, सांताक्रूझ येथील कालिना, मालवणी चर्च परिसर, मढ, मार्वे, गोराई, मनोरी आदी गावठाणात आजही ईस्ट इंडियन जमातीच्या मालकीची जुनी टुमदार घरे पाहायला मिळतात. यापैकी काही घरे पुनर्विकासाच्या नावाखाली जमीनदोस्त झाली. गावठाणांचा पुरातन इतिहास जपण्यासाठी १९९६ मध्ये तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली. परंतु या समितीचाही आता विसर पडला आहे. याच स्तंभात गावठाणांच्या दुरवस्थेबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
साधारण चारशे वर्षांचा इतिहास असलेली चोवीस आळ्या आणि पाखाड्यांची वांद्रे गावठाणातील वस्ती असाच आब पुरातन गावठाणांमध्ये आजही आढळतो. ब्रिटिशपूर्व काळात वांद्रे परिसरात कोळी-आगऱ्यांची, खिश्चनांची अनेक गावे होती. माहीम ब्रिटिशांच्या ताब्यात होते.वांद्रे पोर्तुगीजांकडे होते. वांद्रे किल्ला मागे असलेल्या टेकाडाच्या सान्निध्यात मानवी वस्त्या होत्या. प्रमुख वसाहत ईस्ट इंडियन खिस्ती लोकांची होती.आज चुइम, शर्ली, दांडा, पाली, कांटवाडी, रांवर अशा अनेक गावांत गावठाण संस्कृती शहरीकरणामुळे हरवली असली तरी आपले अस्तित्त्व टिकवून आहे. रांवर गावठाणातून फेरफटका मारताना आपण नकळत भूतकाळात शिरतो. चिंचोळ्या गल्ल्या, एकमेकांना खेटून असलेली घरे, प्राचीन सांस्कृतिक परंपरा, बांधीव रस्ते, कौलारू घरे, चौकांना जोडणारे रस्ते, जागोजागी असणारे क्रॉस या साऱ्या खुणा मुंबईच्या एकेकाळच्या इतिहासाची साक्ष आहेत. काही गावठाणांमध्ये आजही ईस्ट इंडियन खाद्य संस्कृतीचे दर्शन घडते. जुनी, वयोवृद्ध माणसे, त्यांचे कपडे, भाषा आणि बोलण्याची विशिष्ट ढब काही घरांतून आजही आढळते. विशिष्ट पद्धतीने रंगवलेली दुकाने, रस्ते,चौक, क्रॉस, भिंतीवर चितारलेली चित्रे, टुमदार घरे, घरांचे छज्जे त्यावरील जाळ्या हेच चित्र गावठाण असल्याची जाणीव करुन देतात. गावठाणातील मातीत रूजलेले सांस्कृतिक संदर्भ, लोकदेवता आणि पोर्तुगीजपूर्व हिंदू आणि पोर्तुगीज-ब्रिटिश ख्रिस्ती परंपरांचा संगम या गावठाणांमध्ये ठळकपणे दिसून येतो. फक्त प्रश्न आहे, यांचा विचार कधी होणार? शासनाच्या कुठल्याही नियमावलीत कोळीवाडे-गावठाणांचा गांभीर्याने विचार झालेला नाही, हीच त्यांची शोकांतिका आहे.
nishant.sarvankar@expressindia.com
