मुंबई : मुंबईतील उद्याने व खेळाच्या मैदानांमध्ये सायंकाळनंतर समाजकंटकांचा वावर वाढत असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.

मुंबई महापालिकेत्या उद्यानांमध्ये सायंकाळनंतर अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, दारूविक्री तसेच समाजविघातक घटना घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होत असून या पार्श्वभूमीवर बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. मुंबईतील सर्व उद्याने, मनोरंजन मैदाने व खेळाची मैदाने या ठिकाणी रात्रीच्या वेळी पोलिस गस्त (पेट्रोलिंग) वाढविण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

हेतल गाला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, शुद्ध व ताज्या हवेची गरज लक्षात घेता, उद्याने, मनोरंजन मैदाने व खेळाची मैदाने ही नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. मात्र, मुंबईतील शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमधील अनेक उद्याने व मैदानांमध्ये सायंकाळनंतर समाजकंटकांचा वावर वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः मुंबईतील काही ठिकाणच्या उद्यानांमध्ये अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, दारूविक्री तसेच समाजविघातक घटना घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून सामाजिक शांततेला बाधा पोहोचत आहे.

समाजविघातक कारवायांना आळा बसेल व नागरिकांना निर्धास्तपणे मैदाने, उद्याने या ठिकाणी वेळ घालविता येईल यासाठी पोलिस बंदोबस्त व नियमित गस्त वाढविणे गरजेचे असल्याचे मत हेतल गाला यांनी या पत्रात व्यक्त केले आहे.

मुंबईत ३२५ उद्याने

मुंबईमध्ये एकूण ३२५ उद्याने, ३६९ खेळाची मैदाने, ४८० मनोरंजन मैदाने असून नागरिकांना अधिकाधिक मोकळी जागा उपलब्ध करून देणे व हरित क्षेत्र टिकवून ठेवणे हे महापालिकेचे धोरण आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची सुरक्षितता कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.