बृहन्मुंबईत एकेकाळी २०० च्या आसपास गावठाणे होती. ती कमी होऊन ११८ वर आली. महापालिकेच्या नोंदीनुसार ती संख्या आता ८९ वर येऊन पोहोचली आहे. दिवसेंदिवस ही संख्या रोडावत जाणार आहे. कोळीवाड्यांप्रमाणे गावठणांचे अस्तित्त्वही पुसले जाणार आहे. उत्तुंग इमारतींच्या गर्दीत ही गावठाणे हरवली आहेतच. आता ती गायब होणार आहेत.

पश्चिम उपनगरातील अशी अधोरेखित होतील अशी गावठाणे म्हणजे अंधेरी पूर्वेतील मरोळ, सहार आणि विलेपार्ले येथील पॅांड गावठाण. या गावठाणांचे वैशिष्ट्य म्हणजे या गावठाणात प्रामुख्याने ईस्ट इंडियन जमातीचे वास्तव्य आहे. किमान ३०० वर्षांचा इतिहास या गावठाणांना आहे. परंतु गावठाणांसाठी विशिष्ट नियमावली नसल्यामुळे ही गावठाणे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली नेस्तनाबूत केली जात आहेत.

मरोळ या गावठाणाबद्दल एक वेगळीच आख्यायिका ऐकायला मिळते. शेरॅान मिस्किटा यांनी केलेल्या एका संशोधन पत्रिकेत ही माहिती मिळते. सध्या जो विहार तलाव आहे तेथे पूर्वी सपाट भाग होता व तेथे वस्ती होती. तीव्र भूकंपामुळे या जमिनीचा काही भाग खचून एक विवर (खड्डा) तयार झाले; ज्याचे रूपांतर पुढे ‘विहार तलावा’त झाले. या आपत्तीतून वाचलेले लोक सध्याच्या मरोळ भागात आले आणि तिथे स्थायिक झाले. मरोळ गावठाणातील हेक्टर परेरा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आजोबा आणि त्यांचे कुटुंब विहारमधून सुखरूप बाहेर पडून मरोळ गावठाणात स्थायिक झाले.

सहार गावठाणातील मूळ रहिवासी येथे किमान ३०० वर्षांपासून राहत असल्याचाही उल्लेख आढळतो. या सर्वांची स्वतंत्र घरे वर्षानुवर्षे आहेत. तरीही विमानतळ प्राधिकरणासाठी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी या घरांचे सर्वेक्षण सुरु केले. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या गावठाणावरही अनेक विकासकांची नजर आहे.

पॅांड गावठाण हे नाव परिसरातील एका मोठ्या तलावावरून पडले आहे. कालांतराने या तलावाचे रूपांतर एका विहिरीत झाले. या विहिरीत सात ते आठ नैसर्गिक झरे आहेत. या झऱ्यांतून सतत पाणी झिरपत राहिल्यामुळे विहिरीतील पाण्याचा स्रोत जिवंत राहिला आहे. या गावठाणातील मूळ रहिवासीही किमान ३०० वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत.

सोळाव्या शतकात पोर्तुगीज मुंबईत आले आणि त्यांनी स्थानिक बहुसंख्य रहिवाशांना रोमन कॅथोलिक पंथात धर्मांतरित केले. या कॅथोलिकांना ‘उत्तर कोकणी ख्रिश्चन’ असे ओळखले जात असे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात, मुंबईचा ताबा ब्रिटिशांना मिळाला. २१ सप्टेंबर १६६८ रोजी, ‘ईस्ट इंडिया कंपनी’कडे मुंबई वार्षिक भाडेपट्ट्याने सोपवण्यात आली. मुंबईतील मूळ कॅथोलिक असलेल्या या ‘उत्तर कोकणी कॅथोलिकांना’ स्वतःची स्वतंत्र ओळख हवी होती. गोवन आणि मंगलोरियन कॅथोलिकांपासून वेगळे म्हणून ते स्वतःला ‘ईस्ट इंडियन कॅथोलिक’ असे संबोधण्यास सुरुवात केली. ही तीन गावठाणे आजही तीच साक्ष पटवतात. मात्र आज या गावठणांवर झोपु योजनांची टांगती तलवार आहे. मरोळ, सहार आणि पॅांड गावठाणात आज जुन्या चाळी वा प्राचीन घरांना झोपुचे टॅग लावले जात आहे. त्यामुळे अनेक वर्षांहून अधिक प्राचीन घरे, पुतळे आणि क्रूस (धार्मिक चिन्हे) नष्ट होणार आहेत. त्यासोबत प्राचीन परंपराही लयास जाणार आहे.

याशिवाय बदलत्या काळानुसार तरुण पिढी विविध कारणांमुळे या गावठाणांपासून दूर जात आहे. उच्च शिक्षण किंवा नोकरीनिमित्त या पिढीचे दुसऱ्या शहरात किंवा देशात स्थलांतर तसेच अधिक सुखसोयींनी युक्त जीवन जगण्याची इच्छा किंवा विभक्त कुटुंब पद्धतीचा अवलंब आदींमुळे सध्या अशा गावठाणांमध्ये प्रामुख्याने वृद्ध जोडपीच राहताना दिसतात. जर ही स्थिती कायम राहिली, तर अनेक घरे रिकामी पडून राहतील आणि त्यांचा इतिहास व वैभव नष्ट होईल, अशी भीतीही हे रहिवाशी व्यक्त करतात. अशा वेळी या गावठाणांचे रूपांतर वारसा स्थळांमध्ये करून तिथे पर्यटनाला चालना दिली जावी, अशी मागणी हे रहिवाशी करीत आहेत. म्हातारपाखाडी, खोताची वाडी वा वांद्र्यातील गावठाणे उत्तुंग इमारतींच्या गर्दीत आपला वारसा हरवून बसले आहेत. या तिन्ही गावठाणांची स्थिती तशीच आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे या गावठाणांची दयनीय स्थिती झाली आहे. विकास नियंत्रण नियमावलीत गावठाणांच्या पुनर्विकासाबाबत धोरण नसल्यामुळे या गावठाणातील ज्येष्ठ नागरिक व्यथित आहेत. बालपणी या रहिवाशांनी घरांसमोरील मोकळ्या जागांचा आणि व्हरांड्यांचा उपभोग घेतला होता. मात्र हीच मोकळी जागा विकासाच्या नावाखाली अत्यंत तुटपुंज्या मोबदल्यात हिरावून घेतल्या गेल्या. गावठाणांचे सीमांकन योग्य प्रकारे झाले नाही. तरीही ते काही करु शकले नाहीत. याचे कारण म्हणजे स्थानिक रहिवासी फारसे शिकलेले नसल्यामुळे, त्यांना आपल्या मालमत्तेची योग्य कागदपत्रे तयार करता आली नाहीत. त्याचा फटका आज त्यांना बसत आहे.

आज या गावठाणांचभोवती झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. या झोपड्यांच्या नावाखाली विकासक गावठाणातील मालकीची स्वतंत्र घरे मूळ रहिवाशांना घरे विकण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. अशातच काही स्थानिकांनी आपली वडिलोपार्जित घरे कधीही न सोडण्याचा किंवा न विकण्याचा निर्धार केला आहे. मात्र तो कितपत टिकू शकेल, याबाबतही ते साशंक आहेत.

जुन्या विहिरींना अद्याप पाणी!

पॅांड गावठाणातील विहीर आजही वापरात आहे. पॉन्ड गावठाणचे मूळ रहिवासी तसेच बाहेरून येऊन स्थायिक झालेले लोक या विहिरीतील पाण्याचा वापर करतात. विहिरीत सतत पाणी येत असते. असे मानले जाते की, या विहिरीतून कितीही पाणी काढले तरी ती कधीही आटत नाही. या विहिरीच्या आतील भिंतीवर एक शिलालेख कोरला आहे. त्यावरून ही विहीर १६५३ मध्ये बांधली
असल्याचे दिसते. मरोळ गावठणातील विहीर सुमारे १०० वर्षे जुनी आहे. महापालिकेने प्रत्येक वस्तीत नळ बसवण्यापूर्वी मरोळ गावठाणातील रहिवासी दैनंदिन गरजांसाठी या विहिरीतून पाणी काढत असत.

ईर्ला गावठाणही धोक्यात!

ईर्ला गावठाण ही देखील ईस्ट इंडियन रहिवाशांची आणखी एक वसाहत विलेपार्ले पश्चिम येथे आहे. ३०० हून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या गावठाणातील दीडशे घरांना महापालिकेने ३१४ अन्वये नोटिसा बजावल्या आहेत. याचा अर्थ ही घरे बेकायदा ठरविण्यात आली आहेत. हा मोक्याचा भूखंड विकासकाच्या माथी मारण्यासाठी हा खटाटोप सुरु असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी करीत आहेत.

nishant.sarvankar@expressindia.com