ठाणे-दिवा पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कल्याण, कसारा, कर्जत येथील प्रवाशांना नवीन फेऱ्यांचा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या पाच महिन्यांत अवघ्या दोनच सामान्य विनावातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र वातानुकूलित फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसलेल्या सामान्य प्रवाशांचे काय असा सवाल प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविणे, पासचे दर कमी करण्याऐवजी तिकीट दर कमी करणे यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शुक्रवार, १९ ऑगस्टपासून मध्य रेल्वेवर आणखी दहा वातानुकूलित लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. मात्र सामान्य लोकल फेऱ्यांच्या बदल्यात वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मेल एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध व्हावी आणि त्यामुळे जलद लोकलचे वेळापत्रकही सुधारावे यासाठी ठाणे – दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले. १८ फेब्रुवारी २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून (व्हिडीओ काॅन्फरन्स) ठाणे – दिवादरम्यानच्या पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण झाले. या लोकार्पणानंतर ३६ नवीन फेऱ्या सुरू करण्यात आल्या. यामध्ये ३४ वातानुकूलित आणि दोन विनावातानुकूलित लोकल फेऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर वातानुकूलित लोकल फेऱ्यांचीच संख्या वाढविण्यात आली. नवीन वातानुकूलित फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सामान्य लोकलसाठी वेळेवर स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडाला. गेल्या पाच महिन्यांत अवघ्या दोनच विनावातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

१९ ऑगस्टपासून वातानुकूलित लोकल फेऱ्यामध्ये आणखी दहा फेऱ्यांची भर पडणार –

सध्या मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ५६ आहे. १९ ऑगस्टपासून या फेऱ्यामध्ये आणखी दहा फेऱ्यांची भर पडेल. विनावातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करून या फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ५६ वरुन ६६ वर पोहोचणार आहे. यामध्ये ठाणे – सीएसएमटी – ठाणे अप आणि डाउन मार्गावर चार फेऱ्या, बदलापूर-सीएसएमटी-बदलापूर चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी-कल्याण दोन फेऱ्या होणार आहेत. यापैकी गर्दीच्या वेळेतील तीन फेऱ्यांचा समावेश आहे. सामान्य फेऱ्या रद्द करण्यात येत असल्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवासी संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी टीका केली आहे. ठाणे – दिव्यादरम्यान पाचवी – सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकल फेऱ्यामध्ये वाढ होईल असे सातत्याने सांगण्यात आले. ही वाढ वातानुकूलित लोकल फेऱ्यांचीच असेल, हे मध्य रेल्वेने तेव्हा स्पष्ट केले नाही. आता फक्त वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्यासाठी सामान्य लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत असून हे योग्य नाही. महत्त्वाचे म्हणजे वातानुकूलित लोकलचे पास दर कमी करण्याऐवजी तिकीट दर कमी करण्यात आले. पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. असे असतानाही त्याचा विचार रेल्वे प्रशासनाने केला नसल्याची टीका त्यांनी केली. रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात आंदोल करण्याचाचा इशारा देण्यात आला आहे.

गर्दीच्या वेळी वातानुकूलित लोकलच्या १३ फेऱ्या –

वातानुकूलितच्या ६६ फेऱ्यामध्ये १३ फेऱ्या गर्दीच्या वेळी सध्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर ५६ वातानुकूलित लोकल फेऱ्या होतात. मध्य रेल्वेवर सध्या गर्दीच्या वेळी सकाळी सहा आणि सायंकाळी पाच फेऱ्या होत आहेत. १९ ऑगस्टपासून दहा वातानुकूलित फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. यापैकी दोन फेऱ्या गर्दीच्या वेळी होतील. परिणामी, भविष्यात वातानुकूलित लोकलच्या सकाळी सात आणि सायंकाळी सहा फेऱ्या होतील.

यामुळे प्रवाशांना निश्चितच सुविधा मिळेल –

“फेब्रुवारीमध्ये पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्यानंतर उपनगरी लोकलच्या ३४ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. वातानुकूलित सेवेतील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या फेब्रुवारी २०२२ मध्ये ५ हजार ९३९ इतकी होती. ऑगस्ट २०२२ मध्ये सहापटीने वाढून ती ३९ हजार ३२० वर पोहोचली. वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ आणि वातानुकूलित सेवा वाढविण्याबाबत होणारी मागणी लक्षात घेऊन १९ ऑगस्टपासून दहा वातानुकूलित सेवा वाढविण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना निश्चितच सुविधा मिळेल.” असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai general local in trouble due to air conditioned service mumbai print news msr
First published on: 18-08-2022 at 16:07 IST