केंद्राचे प्रमाणपत्र; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

पन्नास टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्या पूर्णत: सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून असणाऱ्या मुंबईला केंद्र सरकारकडून हागणदारीमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र सहा महिन्यांसाठी वैध आहे. हागणदारीमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे मुंबई पालिकेचे आयुक्त अजोय मेहतांचे अभिनंदन केले आहे.

स्वच्छता अभियानांतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. मात्र शौचालयापेक्षाही कमी जागेत लोक राहत असल्याने हे धोरण शहरात राबवता येणे शक्य नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षभरात शहरातील हागणदारी सुरू असलेली ठिकाणे लक्षात घेऊन तिथे सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. २८ डिसेंबर रोजी महापालिकेने स्वत: हागणदारी मुक्त झाल्याचे घोषित केले. जानेवारीत आलेल्या केंद्रीय पथकाने पाहणी करून शहर हागणदारी मुक्त असल्याची प्राथमिक नोंद केली. मात्र त्यानंतरही गरीब वस्त्यांच्या आजूबाजूला, कचराभूमीवर, रेल्वे रुळांवर, द्रुतगती महामार्गावर हागणदारी सुरू होती.

कांदिवली, मालाड पूर्व, गोराई, वांद्रे पश्चिम, मानखुर्द, गोवंडी अशा भागांत पुरेशी सार्वजनिक शौचालये उपलब्ध झाली नव्हती. दरम्यानच्या काळात पालिकेने शहरातील ११८ हागणदारींच्या जागेवर सहा महिन्यांत आणखी १३१८ शौचकूप उपलब्ध करून दिले. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजमितीला हागणदारी सुरू असलेल्या जागांवर ४२५७ शौचकूप उपलब्ध आहेत.