Ghatkopar Landslide News: मुंबईतील घाटकोपर भागात मध्यरात्री तीन-साडेतीनच्या सुमारास दरड कोसळली आहे. चिराग नगर येथील गौशिया चाळीवर ढिगारा कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पालिकेचे अग्निशामक दल, पोलीस, वॉर्ड कर्मचारी, संबंधित वीज वितरण कंपनी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना ३ लाखांची मदत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जाहीर केली आहे. तर, जिल्हाधिकाऱ्यांना पुनर्वसनाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

पालिकेच्या मुंबई अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३:४८ च्या सुमारास या घटनेची नोंद झाली. चिराग नगर भागातील राठोड मेडिकलजवळ ही दरड कोसळली आणि त्याचा ढिगारा गौशिया चाळीवर पडला. या घटनेनंतर पालिकेचे अग्निशामक दल, पोलीस, वॉर्ड कर्मचारी, संबंधित वीज वितरण कंपनी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या संशयित रहिवाशांचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन पथकांकडून सध्या बचावकार्य वेगाने सुरू आहे.

“पाऊस सुरू असल्याने अशोक नगर येथे दरड कोसळली असून आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. पोलीसही तैनात करण्यात आले आहे. बचावकार्यासाठी अनेक पथके तैनात आहे. चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे”, अशी माहिती डीसीपी गणेश शिंदे यांनी दिली.

संरक्षक भिंतींसाठी निधी कमी

“अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे. मुलुंडपासून चांदिवलीपर्यंत जो डोंगर आहे, तो आम्हा पाच-सहा आमदारांच्या मतदारसंघात येतो. डोंगराळ भागातील संरक्षक भिंतीचा प्रश्न आहे. भिंतीसाठी जो निधी आहे, त्याकरता मर्यादा आहेत. जे धोकादायक घरे आहेत, त्यांना शासनस्तरावर स्थलांतर करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. संरक्षक भिंतीच्या निधीची वाढ करण्याची गरज आहे. आपण भिंती बांधतो, पण त्यानंतर भिंतीच्यावर काही अनधिकृत झोपड्या बांधल्या जातात, तिथे फसवणूक गोर-गरिबांना या झोपड्या विकल्या जातात. त्यानंतर, त्या अधिकृत केल्या जातात. मग वर पुन्हा भिंत बांधायची. पण संरक्षण भिंती बांधण्याचा क्रम कधीच कमी होत नाही. अनधिकृत झोपड्या बांधताना महानगरपालिका, जिल्हाधिकारी आणि म्हाडा यांचा समन्वय नाही. त्यामुळे, अनधिकृत झोपड्या थांबत नाहीत, त्यामुळे संरक्षक भिंती बांधाव्या लागतात, त्याकरता निधी मिळत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राम कदम यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.

तर, मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ६ ते ८ जण अडकण्याची शक्यता आहे. ही घटना पहाटे ०३:४८ वाजता घडली. बचावकार्य सुरू आहे. एमएफबी, पोलीस, १०८ रुग्णवाहिका, एनडीआरएफ आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमी झालेल्यांमध्ये सोहेल अन्सारी (१८) आणि मोहम्मद अन्सारी (१४) यांचा समावेश आहे. दोन मृतदेह जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अधिक तपशील अपेक्षित आहे.