मुंबई : ‘माझे वडील नायगावमधील कोहिनूर मिलमध्ये होते. संपानंतर गिरण्या बंद झाल्या आणि वडिलांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. मोलमजुरी करून त्यांनी पुढील १० वर्षे आमचे घर सांभाळले, पण त्यांची प्रकृती ढासळत गेल्याने त्यांचे काम बंद करून आम्ही बहिणी मिळेल ते काम करू लागलो. राहायला घर नाही. अशा वेळी सरकारकडून मुंबईत हक्काचे घर मिळेल याच आशेवर ते जगत होते. मात्र २०१५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही, अशी खंत हर्षा गणेश मोरे यांनी व्यक्त केली’.
आता वडील जाऊनही मोठा काळ झाला तरी आम्हाला हक्काचे घर मिळालेले नाही. आमची एक पिढी घर घर म्हणत संपली, आता आमची पिढीही पन्नाशीच्या पलीकडे गेली आहे. तेव्हा आता आणखी किती वर्षे घराची वाट पाहायची, सरकार आमचा अंत पाहत आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यांच्याप्रमाणेच मोठ्या संख्येने गिरणी कामगार आणि त्यांचे वारस आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईतील गिरणी कामगार १९८२च्या संपात उद्ध्वस्त झाला. या कामगारांच्या पुनर्वसनासाठी गिरण्यांच्या जागेवर मोफत घरे देण्याचा निर्णय २००० मध्ये घेण्यात आला. घरे बांधण्याची आणि घरांच्या वितरणाची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई मंडळावर टाकण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत म्हाडाने गिरण्यांच्या जमिनीवरील घरांसाठी तीन आणि एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील योजनेतील घरांसाठी एक, अशा चार सोडती काढल्या आहेत. या सोडतीच्या माध्यमातून अंदाजे १६ हजार कामगारांना, वारसांना घरे दिली आहेत. मात्र आजही एक लाखांहून अधिक कामगार, वारस घराच्या प्रतीक्षेत आहे. म्हाडाकडे दोन टप्प्यांत पावणेदोन लाख अर्ज सादर झाले असून त्यातील अंदाजे १६ हजार अर्जदारांना घरे मिळाली आहेत. तर उर्वरित दीड लाख अर्जदारांपैकी केवळ १ लाख ९ हजार अर्जदारांनी पात्रता निश्चितीसाठी कागदपत्रे जमा केली आहेत. ५० टक्क्यांहून अधिक गिरणी कामगार आज हयात नसल्याची माहिती कामगार संघटनांनी दिली. त्यामुळे आता गिरणी कामगारांच्या वारसांकडून अर्ज सादर होत आहेत.
वारसांची नेमकी संख्या म्हाडाकडे उपलब्ध नसली तरी मूळ कामगार हयात नसल्याने आता वारसांची संख्या वाढत असल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकार्यांनी दिली. हर्षा मोरे यांच्याप्रमाणेच लक्ष्मण वाळवेकर यांनाही घराची प्रतीक्षा आहे. ज्युपिटर मिलमध्ये असलेल्या त्यांच्या वडिलांचा १९९८ मध्ये मृत्यू झाला. आर्थिक स्थिती बिकट असून माझे कुटुंबही प्रतीक्षानगरला भाड्याच्या घरात राहत आहे. सरकारने गिरणी कामगारांच्या, वारसांच्या घराच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी वाळवेकर यांनी केली.
शेलू आणि वांगणीमध्ये ८१ हजार घरे बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी या घरांना मोठ्या संख्येने कामगारांचा विरोध आहे. म्हाडाकडून जागेचा शोध घेतला जात आहे.
उर्वरित गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. म्हाडाकडूनही जागेचा शोध घेतला जात आहे. या प्रश्नी सरकारची भूमिका सकारात्मक आहे. महामुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबरोबरच मुंबईतही घरे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – सचिन अहिर, विधान परिषदेचे उपसभापती
एकीकडे आमच्या घरांसाठी मुंबईत जागा मिळत नाही, पण दुसरीकडे खासगी विकासकांना मोकळ्या जागा, मिठागरांच्या जागा आंदण दिल्या जात आहेत. मूळ गिरणी कामगारांपैकी आता ३५-४० टक्केच कामगार हयातीत असतील. आता त्यांच्या वारसांनाही घराचा लढा लढावा लागत आहे. हे आणखी किती वर्षे चालणार, किती वर्षे आम्ही आणि आमच्या पिढ्यांनी लढायचे? आता सरकारने ठोस धोरण कामगारांच्या घरांसाठी आखावे, हीच आमची मागणी आहे. – प्रवीण येरुणकर, सरचिटणीस, गिरणी कामगार संघर्ष समिती
