Mumbai-Goa Highway Mangaon Bypass Update: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन असून पनवेल ते झाराप या मुंबई -गोवा महामार्गावरील ४१७ किमी मार्गाचे चौपदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
माणगाव बाह्यवळण मार्गाची लांबी ७.५ किलोमीटर असून या मार्गावर तीन उड्डाणपुल आहेत. त्यापैकी एका उड्डाणपुलाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित दोन मोठ्या पुलांची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. हे दोन्ही पूल ३१ जुलैपर्यंत पूर्ण होतील. माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.
इंदापूर बाह्यवळण मार्ग ३.५ किलोमीटर लांबीचा असून येथील उड्डाणपुलाचे ४० टक्के काम झाले आहे. हा पूल डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल. संपूर्ण बाह्यवळण मार्ग २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पनवेल ते झारप या ४४९ किलोमीटर लांबीच्या मुंबई- गोवा महामार्गापैकी ४१७ किमी चौपदरीकरण पूर्ण झाले. उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून ऑगस्टपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील पुलाच्या पोहोच मार्गाची कामेही प्रगतीपथावर आहेत, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीची चणचण नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा विभागाला केलेली आर्थिक तरतूद तब्बल 62 टक्के मी वाढलेली आहे. तसेच परशुराम घाटात वारंवार दरडी कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर पर्यायी पूल उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे, त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी आशा मंत्री भोसले त्यांनी व्यक्त केली.
कंत्राटांची लवकरच देयके :
कंत्राटदारांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १७ हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत. पुरवणी मागण्यांमध्ये १८९५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटदारांची देयके लवकरच दिली जातील. १ कोटीपर्यंतच्या कंत्राटदारांची देयके त्वरीत अदा करण्यासाठी नवी प्रणाली आणतो आहोत. कंत्राटातील ५६ टक्के रक्कम लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांना वाटण्यासाठी जाते, हा कंत्राटदारांचा आरोप केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबधीत नसल्याचे मंत्री भोसले म्हणाले.
