मुंबई : मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याला १७ वर्षे उलटून गेल्यानंतर या प्रकल्पाचा खर्च तब्बल सुमारे साडेपाच हजार कोटींनी वाढल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. महामार्गातील काही अपूर्ण भाग सातत्याने जीवघेणा ठरत असून दरवर्षी कोकणाकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशन’चे जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या अर्जावर, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या उत्तरानुसार, ३५५ किमीच्या मुंबई-गोवा चौपदरीकरणासाठी असलेल्या दहा पॅकेजची मंजूर किंमत ११ हजार ४९९ कोटींवरुन वाढून १६ हजार ९०९ कोटी इतका झाली आहे. म्हणजेच खर्चात ४८ टक्के वाढ झाली आहे. चिपळूण-रत्नागिरी परिसरातील परशुराम घाट–आरावली या एका पॅकेजचा खर्चच ९८३ कोटींवरून दोन हजार २२६ कोटींवर पोहोचला आहे. या पॅकेजच्या खर्चात १२६ टक्के वाढ झाली असून, सर्व पॅकेजमधील ही सर्वाधिक वाढ आहे. आतापर्यंत खर्च झालेली रक्कम प्रकल्पाच्या मूळ मंजूर अर्थसंकल्पापेक्षाही अधिक आहे. असे असतानाही महामार्गाचे मोठे भाग अद्याप अपूर्ण आहेत, याकडे घाडगे यांनी लक्ष वेधले.

सरकारने कोणतीही जबाबदारी निश्चित न करता कोकणाची जीवनवाहिनी असलेल्या या महामार्गाकडे सतत खर्चवाढीसाठी एटीएम म्हणून पाहिले आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे मुंबई-गोवा महामार्गाशी इतर अनेक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या तुलनेत वेगळी वागणूक दिली जात आहे. पनवेल-इंदापूर या टप्प्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत असताना महाराष्ट्रातील उर्वरित भागाच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे च देण्यात आली आहे. हे प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग कार्यक्रमांतर्गत राबवले जात आहेत. हजारो कोटी रुपये मंजूर होऊन खर्च झाल्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रकल्प जवळपास १५ वर्षे अपूर्ण राहिला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात या महामार्गाच्या विलंबाची झळ सर्वाधिक तीव्रतेने जाणवते. मुंबईत राहणारे लाखो कोकणवासी दरवर्षी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जातात. सात तासांत पूर्ण व्हायला हवा असलेला हा प्रवास अनेकदा १२ तासांहून अधिक लांबतो. खड्डे, अपूर्ण पूल आणि एकेरी मार्गाच्या अरुंद ठिकाणांमधून बस आणि कार अक्षरशः रेंगाळत पुढे जातात. राज्यातील अन्य महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पाशी तुलना केली तर या प्रकल्पातील दिरंगाई अधिक ठळकपणे समोर येते. राज्याने अवघ्या सात वर्षांत पूर्णपणे नवीन ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग उभारला; मात्र अस्तित्वात असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला जवळपास १५ वर्षे उलटूनही तो अद्याप अपूर्ण आहे, असेही घाडगे यांचे म्हणणे आहे. सध्या ज्या पद्धतीने काम सुरु आहे ते पाहता आणखी किती वर्षांनंतर हा महामार्ग पूर्ण होणार आहे हेही सांगता येत नाही, असे ते म्हणाले.