मुंबई: मागील १४ वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग अद्याप पूर्ण झाला नसतानाच टोलवसुलीला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असताना राजकीय पक्षांकडूनही या टोलवसुलीला विरोध होत आहे. शिवसेना (ठाकरे), शेकापपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मंत्री आदिती तटकरे यांनीही या टोलवसुलीला विरोध केला असून यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन टोलवसुली स्थगित करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप मोठ्या प्रमाणात अपूर्ण असताना सिंधुदुर्गातील ओरोस येथे तसेच रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथे टोलवसुली सुरू करण्याची तयारी केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडून करण्यात आली. त्यात खारपाडा येथे टोलवसुली सुरूही झाल्याने या अन्यायकारक टोलवसुलीविरोधात नागरिकांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. यात आता राजकीय पक्षही सामील झाले असून मंत्री आदिती तटकरे यांनी या टोलवसुलीला विरोध दर्शवत, कामे पूर्ण होण्यापूर्वी नागरिकांवर आर्थिक भार टाकणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच टोलवसुली सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात टोलवसुली सुरू झाल्यास कोकणातील स्थानिक वाहनांना टोलमधून सूट देण्याची मागणीही केंद्र सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीला विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातूनही विरोध केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे आणि कोलाड येथील उड्डाणपूल, सुकेळी खिंड परिसरातील रस्त्याचे काम, तसेच माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची कामे अशा अवस्थेत असताना टोलवसुली केली जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
टोलवसुली कुठे आणि किती?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि पेणदरम्यान असलेल्या खारपाडा येथे टोलवसुली सुरू केली असून चारचाकी वाहनांसाठी ९५ रुपये शुल्क आकारले जात आहे. तीन महिन्यांसाठी ‘कल्याण इन्फ्रा’ या कंपनीला टोलवसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. १५ मेपासून ही वसुली सुरू झाली आहे. रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसताना तसेच अधिकृत लोकार्पणही झाले नसताना टोल आकारणी अन्यायकारक असल्याची भावना निर्माण झाली आहे. या टोलवसुलीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहतुककोंडीलाही सामोरे जावे लागत आहे.
