मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतानाही पथकर वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मंत्री अदिती तटकरे यांनीही या पथकर वसुलीला विरोध केला आहे. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याला स्थगिती देण्याची मागणी करणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असताना सिंधुदुर्गातील ओरोस येथे पथकर वसुली सुरू करण्याची तयारी केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडून करण्यात आली. त्यात खारपाडा येथे वसुली सुरूही झाल्याने याविरोधात नागरिकांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. यात आता राजकीय पक्षांनी आवाज उठवला असून, कामे पूर्ण होण्यापूर्वी नागरिकांवर आर्थिक भार टाकणे योग्य नसल्याचे तटकरे यांनी सांगितले.
महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच पथकर घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. कोकणातील वाहनांना यातून सूट देण्याची मागणीही केंद्र सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पथकर वसुलीला विरोधकांसह सत्ताधारी पक्षातूनही विरोध केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे आणि कोलाड येथील उड्डाणपूल, सुकेळी खिंड परिसरातील रस्त्याचे काम, तसेच माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
पथकर वसुली कुठे आणि किती?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पनवेल आणि पेणदरम्यान असलेल्या खारपाडा येथे पथकर वसुली सुरू केली आहे. चारचाकी वाहनांसाठी ९५ रुपये शुल्क आकारले जात आहे. तीन महिन्यांसाठी ‘कल्याण इन्फ्रा’ या कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले आहे. रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसताना ही आकारणी अन्यायकारक असल्याची भावना निर्माण झाली आहे.
