मुंबई: गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग कोकणवासीयांसाठी सुकर व्हावा म्हणून आता सरकार हातघाईवर आले आहे. महामार्गाच्या कामाचा सतत आढावा घेऊ नका तर प्रत्यक्ष काम पूर्ण करा असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले आहेत. ३१ ऑगस्ट आधी कोलेटी, संगमेश्वर, निवळी, लांजा या उड्डाण पुलांची कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आले असून माणगाव बाह्यवळण मार्गात रेल्वे पुलाचे गर्डर टाकण्यासाठी २० ऑगस्टपासून कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्ग अद्याप पूर्ण होत नसल्याने कोकणवासीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यात गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आल्याने आणि महामार्गावरील काम पूर्ण हेण्यासाठी नवीन तारखा मिळू लागल्याने त्यात आणखी भरच पडली. या भावना लक्षात घेत मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांनी स्वत: महामार्गाची पाहणी केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या रस्त्याची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्राधिकरणांची बैठक घेऊन हा महामार्ग गणेशोत्सवाआधी सुकर करण्याचे आदेश दिले. ३१ ऑगस्टआधी कोलेटी, संगमेश्वर, निवळी, लांजा या उड्डाणपुलांची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.

२० ऑगस्टला मेगाब्लॉक

माणगाव बाह्यवळण मार्गावरील एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहे. हा सुमारे ७.५ किमीचा मार्ग ५.५ किमीपर्यंत एकमार्गी सुरू करणे शक्य होणार आहे. त्याच्या पुढील टप्प्यासाठी २० ऑगस्टपासून मेगाब्लॉक घेऊन रेल्वेपुलावरील गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. गर्डर टाकून पूर्ण होताच पुढील कामही वेगाने पूर्ण करून उर्वरित दोन किमीचा मार्गही एकमार्गी वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल.

चिपळूण उड्डाणपूलही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न

चिपळूण येथील सर्वात मोठा उड्डाणपूल पूर्ण करण्याचे कामही वेगाने केले जात आहे. या उड्डाणपुलावरील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून प्रांत कार्यालयाजवळी भरावाचे कामही वेगाने पूर्ण केले जाईल. पावसाने उसंत दिल्यास गणेशोत्सवाआधीही हाही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकामंत्र्यांनी सांगितले.