मुंबई : गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने खर्चात एकूण ४८ टक्के वाढ झाली आहे. प्रकल्पाचा खर्च तब्बल सुमारे ५,५०० कोटींने वाढल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.मुंबई व गोव्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे चौपदरीकरण करण्यास केंद्राने मंजुरी देऊन १७ वर्षे झाली. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीत प्रकल्पाचा खर्च सुमारे ५,५०० कोटींनी वाढला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती मागवली होती.
महामार्गाचे अपूर्ण भाग सातत्याने जीवघेणे ठरत असून दरवर्षी कोकणाकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या उत्तरानुसार, राज्यातील महामार्ग ६६ च्या ३५५ किमीच्या चौपदरीकरणासाठी असलेल्या १० पॅकेजचा मंजूर खर्च ११,४०९.१४ कोटींवरून वाढून १६,९०९.२२कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच खर्चात ४८ टक्यांची वाढ झाली आहे.
चिपळूण-रत्नागिरी परिसरातील परशुराम घाट-आरावली या एका पॅकेजच्या खर्चात १२६ टक्यांची वाढ झाल्याने खर्च ९८३ कोटींवरून २,२२६ कोटींवर पोहोचला आहे. महामार्गातील सर्व पॅकेजमधील ही सर्वाधिक वाढ आहे. आजवर महामार्गाच्या कामासाठी ११,५७७ कोटी खर्च झाले असूनहा खर्च प्रकल्पाच्या संपूर्ण मूळ मंजूर अर्थसंकल्पापेक्षाही अधिक आहे. तरीही महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे.
चौपदरीकरण १५ वर्षानंतरही अपूर्ण
गणेशोत्सव काळात या महामार्गाच्या विलंबाची झळ अधिक तीव्रतेने जाणवते. मुंबईत राहणारे लाखो कोकणवासी, नोकरदार दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या मूळ गावी जातात. गावी पोहोचण्यासाठी सात तास अपेक्षित असताना अनेकदा त्यासाठी १२ तासांहून अधिक वेळ लागतो. खड्डे, अपूर्ण पूल व एकेरी मार्गाच्या अरुंद ठिकाणांमधून वाहने अडकून पडतात.
राज्यातील दुसऱ्या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पाशी तुलना केली तर ही दिरंगाई अधिक ठळकपणे निदर्शनास येते. राज्याने अवघ्या सात वर्षांत पूर्णपणे नवा ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग उभारला. मात्र अस्तित्वात असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पाला जवळपास १५ वर्षे उलटून गेल्यानंतरही तो अद्याप अपूर्ण आहे.
२०१६ पर्यंत पूर्ती अपेक्षित होती
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम २०११ मध्ये सुरू झाले. या ४४० किलोमीटरच्या पट्ट्याचे काम पूर्ण होऊनही, खड्डे, पाणी साचणे, दुरुस्ती व वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या कायम आहेत. महामार्गावरील खारपाडा पथकर नाक्यावर मेमध्ये पथकर वसुली सुरू झाली. मात्र, आजही काही भागांवर काम व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. महामार्गावर बांधलेला एक उड्डाणपूल २०२१ मध्ये कोसळल्याने सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली. मुंबई-गोवा महामार्ग मुळात २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. भूसंपादन, बांधकामापूर्वीची मंजुरी आणि कंत्राटदारांशी संबंधित समस्यांमुळे वारंवार विलंब झाला. केंद्र सरकारने २०२४ मध्ये, संसदेत दिलेल्या माहितीनुसार भूसंपादन आणि काही कंत्राटदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी ही प्रकल्पाच्या विलंबाची कारणे होती.
