मुंबई : गेल्या एक तपापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केले जाईल. तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या सुखकर प्रवासासाठी २५ आगस्टपूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल सुनील प्रभू, शेखर निकम, जितेंद्र आव्हाड आदींनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान चव्हाण यांनी या महामार्गाचे काम रखडले, ही वस्तुस्थिती असल्याचे मान्य केले. भूसंपादनासाठी लागलेला कालावधी आणि इतर अनेक कारणांमुळे येथील काम संथगतीने सुरू आहे. मात्र, महामार्गाचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. परशुराम घाटाचे रखडलेले काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 बारा वर्षे होऊनही या महामार्गाचे काम का पूर्ण झाले नाही, अशी विचारणा यावेळी सदस्यांकडून करण्यात आली. तसेच कशेडी, रायगड घाटातील कामही अत्यंत धीम्या गतीने सुरू असून, येथील कामांमुळे आजूबाजूच्या गावांना धोका असल्याने त्याबाबत काय उपाययोजना करणार, अशी विचारणाही यावेळी करण्यात आली.

 या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत, ही वस्तुस्थिती असल्याची कबुली यावेळी चव्हाण यांनी दिली. अनेक अडचणींवर मात करीत संथगतीने हे काम सुरू आहे. येणारा गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण लक्षात घेऊन २५ ऑगस्टपर्यंत महामार्ग खड्डेमुक्त केला जाईल, असे त्यांनी सांगितले. कशेडी तसेच परशुराम घाटात दरड कोसळून निर्माण होणारा अडथळा लक्षात घेता घाट परिसरातील मातीचे ‘टेरी’कडून परीक्षण केले जात आहे. त्यानंतर ‘टेरी’च्या सल्ल्यानुसार या मार्गात उपाययोजना करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

दहा वर्षांत दीड हजार बळी

गेल्या १२ वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले आहे. या महामार्गावर दहा वर्षांत ६,६९२ अपघात झाले असून, १५१२ जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे या महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.