मुंबई : गोरेगाव येथील युनिट नंबर १३ वरील रस्त्यावरून जात असताना चालत्या दुचाकीवर झाडाची मोठी फांदी पडून १८ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. कुमार हसन रझा जहांगीर आलम सय्यद (१८) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुर्ल्यात झाड पडून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर काहीच तासांतच हा दुसरा बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
कुमार हसन रझा जहांगीर आलम सय्यद हा तरुण शनिवारी दुपारी मित्रांसह दुचाकीवरून आरे कॉलनी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. आरे कॉलनीतील युनिट क्रमांक १३ येथून जात असताना दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडाची एक मोठी फांदी तुटून कुमारच्या डोक्यावर पडली. या दुर्घटनेत कुमार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी मालाड येथील बालाजी रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.
कुर्ला येथील दुर्घटनेत युनूस कुंदावाला (६३) यांचाही रविवारी मृत्यू झाला. ही दुर्घटना ताजी असतानाच झाड पडून तरुणाचा मृत्यू झाल्याच्या बातमीने मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहेदरम्यान, मुंबईतील झाडेच आता मुंबईकरांसाठी मृत्यूचे सापळे बनू लागल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. चेंबूरमधील दुर्घटनेत ३० जून रोजी ११ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर २ जुलै सांताक्रुझमध्ये झाड पडून आठजण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यांनतर रविवारी एकाच दिवशी झाड पडून दोघांचे जीव गेल्याने मुंबईतील कमकुवत झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून पालिकेच्या पावसाळापूर्व वृक्षछाटणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँक्रिटीकरणात बाधित झाल्याने झाडे अशक्त होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
