मुंबई : आई – वडिलांनी मोबाइलमध्ये गेम खेळण्यास विरोध केल्याने १४ वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली. गोरेगावमधील आरे कॉलनी परिसरात ही घटना घडली. लक्ष्मी यादव असे या मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा केला आहे.

गोरेगाव (पूर्व) येथील आरे कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या लक्ष्मी यादवला (१४) मोबाइलवर गेम खेळायची खूप आवड होती. तासंतास ती मोबाइलवर गेम खेळत असायची. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून ती मोबाईइवर खेळत रहायची. त्यामुळे तिचे पालक सतत तिला ओरडत होते. लक्ष्मी सोमवारी दुपारी बराच वेळे मोबाइलवर गेम खेळत होती. त्यामुळे पालकांनी तिचा मोबाइल काढून घेतला. यामुळे लक्ष्मी संतापले. रागाच्या भरात ती दुपारी ४ च्या सुमारास आतील खोलीत गेली आणि आतून दरवाजाला लावून घेतला. खोलीतील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून तिने आत्महत्या केली. हा प्रकार समजताच पालकांनी तिला खाली काढले. मात्र तोपर्यंत ती बेशुध्द झाली होती. तिला उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मोबाइल काढून घेतल्याने मुलीने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचा जबाब तिच्या पालकांनी दिला. त्यावरून आम्ही अपमृत्यूचा गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.

मुलांमधील आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक

किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. अगदी १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुले क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या करू लागले आहेत. आई ओरडली, मोबाइल काढून घेतला किंवा अन्य क्षुल्लक गोष्टींमुळे मुले आत्महत्या करीत आहेत. ही एक सामाजिक समस्यान बनली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आभासी जगतातील एकांतपणा, खेळाचे व्यसन आणि पालकत्वातील दुरावा असल्याने लहान मुलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्याचे प्रसिध्द मानसोपचारतज्ञ डॉ सुरेश पाटील यांनी सांगतिले. मोबाइल गेम्समधून मिळणारे आभासी सुख, स्पर्धा आणि सततच्या उत्तेजनामुळे काही मुले वास्तवापासून तुटतात. जेव्हा अपेक्षेपेक्षा काही होत नाही, किंवा गेम बंद करण्यास सांगितल्यावर त्यांना एक प्रकारचा रिक्तपणा निर्माण होतो आणि त्यातून नैराश्य निर्माण होऊन ते टोकाचे पाऊस उचलतात. पालकांनी मुलांशी सतत संवाद साधावा, मोबाइल वापरावर लक्ष ठेवावे, मुलांचे भावनिक बदल ओळखण्याची सजगता ठेवावी, तसेच शाळा, समाज आणि पालकांनी एकत्र येऊन डिजिटल मर्यादा ठेवली, मानसिक स्वास्थ वाढवले तर अशा घटना टळू शकतात, असे त्यांनी सांगितले.