मुंबई: वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर बेकायदेशीलरित्या उपचार करणाऱ्या दोन बोगस डॉक्टराना गुन्हे शाखेने गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातून अटक केली. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही आरोपी रुग्णांवर उपचार करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा जप्त केला.राजीव रंजन (३४) आणि कुबेरनाथ यादव (५६) अशी या अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत.

कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना ते रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या परिमंडळ ६ मधील अधिकाऱ्यांना मिळाली. पोलिसांनी याबाबत खात्री केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या एम – पूर्व विभाग कार्यालयातील वैद्यकीय विभागाला याबाबत माहिती दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गुरुवारी सकाळी आरोपींच्या दोन वेगवेगळ्या दवाखान्यांवर छापा घातला.

या छाप्यादरम्यान दोन्ही आरोपी रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे वैद्यकीय पदवीबाबत विचारणा केली. मात्र त्याच्यांकडे कुठल्याही प्रकारची पदवी नसल्याचेउघडकीस आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

यापूर्वीही पोलिसांनी गोवंडी परिसरातील अनेक बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. मात्र असे असले तरी या भागात आणखी काही बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत. आशा बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.