करोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या वर्षापासून शाळा बंद आहेत. या वर्षीही शाळा कधी सुरु होती याची शाश्वती नाही. तसेच महापालिका शाळांचा दर्जा पाहता पालकांनी शाळांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांची गळती थांबण्याचं नाव घेत नाही. असं असताना आता मुंबई महापालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. सीबीएसई, आयसीएसई शाळा सुरु केल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्डाचं शिक्षण घेता येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात शाळा सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं.

“प्रत्येक मुंबईकर आपण किती फी देऊ शकतो याचा विचार न करता मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत येऊन केंब्रिज बोर्ड असेल की, सीबीएसई असेल. आज आपण केंब्रिज बोर्डाचा एक महत्त्वाचा पल्ला पार करत आहोत. पुढचे दोन महिने यांच्यासोबत बसून यात किती शाळा आपण घेऊ शकतो. सुरुवातीला एक शाळा जरी असेल. तरी प्रत्येक वार्डमध्ये कमीत कमी एक शाळा तरी करू शकू का? जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी याचा फायदा करून घेऊ शकतील. विद्यार्थ्यांना करिअर, रिसर्चसाठी भविष्यात फायदा होईल.”, असं पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. २०१३ मध्ये आपण व्हर्चुअल क्लासरुमची संकल्पना महापालिका शाळांमध्ये प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशीही काही शाळांची संलग्नता करण्यात आली, त्याच पद्धतीने केंब्रिज बोर्डासमवेतही संलग्नता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

यापूर्वी पालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता पालिका शाळांचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यामिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कूल असे संबोधण्यात येत आहे. त्याकरिता नवीन बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे.