मुंबई : मुंबई आणि गुजरातमध्ये आर्थिक संबंध अधिक दृढ झाले असून दोन्ही प्रदेश मिळून आशियातील सर्वाधिक शक्तिशाली आर्थिक मार्गिका (इकॉनॉमिक कॉरिडॉर) बनण्याची क्षमता आहे, असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी व्यक्त केला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा संदर्भ देत त्यांनी गुजरातची सर्वाधिक लांबीची किनारपट्टी, जागतिक दर्जाची बंदरे, समर्पित मालवाहतूक मार्गिका (डीएफसी), दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिका, गिफ्ट सिटी, मजबूत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे जाळे आणि कुशल मनुष्यबळ ही गुंतवणुकीसाठीची प्रमुख बलस्थाने असल्याचे नमूद केले.

गांधीनगरमध्ये १०, ११ आणि १२ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या वायब्रंट गुजरात ग्लोबल समिट-२०२७च्या मुंबईतील रोड शोमध्ये बोलताना पटेल यांनी मुंबई आणि गुजरातच्या आर्थिक सामर्थ्याचा एकत्रितपणे उपयोग करण्याचे आवाहन उद्योग क्षेत्राला केले. त्यांनी ‘यही समय है, सही समय है’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा उल्लेख करत उद्योगांना गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले.

‘गुजरातमध्ये या, गुजरातमध्ये वाढा आणि गुजरातसोबत वाढा’, असे आवाहन करत पटेल यांनी महाराष्ट्रासह देश-विदेशातील उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये गुंतवणुकीचे निमंत्रण दिले. नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, सेमीकंडक्टर आणि हरित उत्पादन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांत गुजरात नेतृत्व करण्यास सज्ज असल्याचे पटेल यांनी सांगितले. गुजरातमधील प्रत्येक धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील कार्यक्रमात विविध देशांचे वाणिज्यदूत, परदेशी दूतावासांचे प्रतिनिधी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. २००३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या वायब्रंट गुजरात परिषदेला मिळालेल्या यशामुळे गुजरात आज देशाचे औद्योगिक केंद्र आणि भविष्यातील जागतिक प्रवेशद्वार म्हणून पुढे आले असल्याचा दावा पटेल यांनी केला. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात गुजरातचा ८.२ टक्के, उत्पादन क्षेत्रात १७ टक्के, तर वस्तू निर्यातीत २५ टक्के वाटा असल्याचा दावा त्यांनी केला.

३.५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था

‘विकसित गुजरात २०४७’च्या उद्दिष्टानुसार गुजरातला ३.५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष्य असल्याचे पटेल यांनी सांगितले. प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी चार प्रादेशिक परिषदांचे आयोजन करण्यात आले असून सहा आर्थिक प्रादेशिक आराखडे तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. गुजरातचे मुख्य सचिव एम. के. दास यांनी राज्यातील औद्योगिक पायाभूत सुविधा, रस्ते, विमानतळ आणि बंदरांची माहिती दिली. देशातील एकूण मालवाहतुकीपैकी सुमारे ४० टक्के माल गुजरातमधून हाताळला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘विकसित गुजरात औद्योगिक धोरणा’त उद्योगांना प्रोत्साहनासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

उद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव ममता वर्मा यांनी गुजरातची जागतिक पुरवठा साखळीतील वाढती भूमिका अधोरेखित केली. पारंपरिक उद्योगांपलीकडे जाऊन सेमीकंडक्टर आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही गुजरातने क्षमता निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय उद्योग महासंघाचे (अध्यक्ष आर. मुकुंदन यांनी गुजरातमधील धोरणात्मक स्थैर्य, उद्योगांशी सातत्याने संवाद आणि सरकारचा तत्पर प्रतिसाद यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे नमूद केले. आरपीजी एंटरप्रायझेसचे उपाध्यक्ष अनंत गोयंका आणि ब्लू स्टार इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीर अडवाणी यांनीही गुजरातमधील त्यांच्या उद्योगांच्या अनुभवांची माहिती दिली.