मुंबई : महापालिकेच्या महासभेत गुरुवारी शिवसेनेचे (ठाकरे) नगरसेवक यशोधर फणसे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे फेरीवाल्यांच्या समस्येवर बोट ठेवले. मुंबईत भूमाफियांप्रमाणे फेरीवालामाफियांची टोळी निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. यावर झालेल्या चर्चेनंतर या प्रकरणी ताबडतोब उपाययोजना करून फेरीवाल्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचे आदेश महापौर रितू तावडे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

महापालिकेच्या मागील सभेत नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळाली नव्हती. त्यावरून रितू तावडे यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे गुरुवारी आयोजित महासभेत फेरीवाला विषयावर सर्व नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळाली. फेरीवाल्यांच्या विषयावर तीन तास चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे (ठाकरे) नगरसेवक यशोधर फणसे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे फेरीवाल्यांशी संबंधित मुद्दा उपस्थित केला. त्यावर अनेक नगरसेवकांनी आपापल्या विभागातील फेरीवाल्यांशी संबंधित समस्या मांडल्या.

फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, इमारतीच्या आसपास बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास, त्यांची अरेरावी, मुजोरी आदी मुद्दे सभेत उपस्थित करण्यात आले. या समस्येवर सर्वपक्षीय नगरसेवकांचे एकमत झाले. उपनगरातील एका विभागात फेरीवाल्यांच्या संघटनांनी बाजारात गाळे विकत घेतले आहेत. सर्व परप्रांतीय फेरीवाले मिळून त्यात हातगाड्या ठेवत असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. तसेच, मराठी फेरीवाले रस्त्यावर छोटे – छोटे स्टॉल लावत असल्याचे त्यांनी नमूद केले. अमराठी फेरीवाले कोण आणि कुठून येतात, याची माहिती प्रशासनाला देखील नसल्याची खंत नगरसेवकांनी सभागृहात व्यक्त केली. त्यामुळे फेरीवाल्यांच्या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच, त्याची कठोर अंमलबजावणी करून ही समस्या मार्गी लावावी, असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.