मुंबई : मुंबईतील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) मुख्य समिती आणि सात परिमंडळीय समिती निवडणुकीची मतमोजणी महानगरपालिका मुख्यालयात नुकतीच पार पडली. शनिवार, २८ मार्च आणि रविवार, २९ मार्च असे दोन दिवस मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणी झाल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मतमोजणीचा निकाल न्यायालयामध्ये सादर करण्यात येईल व न्यायिक प्रक्रियेनंतरच निकाल सार्वजनिक करण्यात येणार आहे.

महापालिकेत शनिवारी दुपारी १२ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सर्व १३६ मतपेट्या बाहेर काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या जवळपास २०० ते २५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने शनिवारी दुपारी १२ वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू केली. सर्वप्रथम मतपत्रिकांची आरक्षणनिहाय विभागणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात झाली. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पारदर्शकपणे सुरू असलेली मतमोजणी प्रक्रिया रविवार, २९ मार्च रोजी सकाळी पूर्ण झाली. त्यावेळी उप आयुक्त विनायक विसपुते, अनुज्ञापन अधिक्षक अनिल काटे यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील पथविक्रेत्यांची एक मुख्य समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या निवडणुकीसाठी २९ ऑगस्ट २०२४ रोजी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले. त्यात सरासरी ४९.४६ टक्के मतदान झाले होते. न्यायालयात दाखल विविध याचिकांमुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, मतदान प्रक्रिया राबवून मतमोजणी आणि निकाल राखून ठेवण्यात आले होते. मात्र, २३ मार्च २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर अंतिम निकाल दिला.

न्यायालयाने २०२४ मध्ये पार पडलेली निवडणूक प्रक्रिया ‘विधिग्राह्य’ ठरवत, मतमोजणीवरील स्थगिती उठवली. तसेच, विनाविलंब निकाल जाहीर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. मतमोजणीनंतर निवडून आलेल्या सदस्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. परंतु मतमोजणीचा निकाल न्यायालयाच्या आदेशानंतरच सार्वजनिक करण्यात येईल. त्यामुळे सर्वप्रथम हा निकाल न्यायालयामध्ये सादर करण्यात येईल. न्यायालयाच्या आदेशानंतर व पुढील प्रक्रियेनंतर निकाल हा सार्वजनिक करण्यात येईल, असे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले.