मुंबई : मुंबईतील फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी आहेत, तर मग दाखवा कुठे आहेत हे फेरीवाले, त्यांना हुडकून त्यांच्या देशात परत पाठवा, त्यांना परत पाठवण्यासाठी कोणता निधी वापरणार ते पण सांगा, असे आव्हान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर रितू तावडे यांना दिले. फेरीवाल्यांना लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने कर्ज दिले, त्यावेळी फेरीवाले बांगलादेशी नव्हते का, असाही खोचक सवाल पेडणेकर यांनी केला.

मुंबई महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर लगेचच महापौर रितू तावडे यांनी बांगलादेशी फेरीवाल्यांना हटवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महापालिकेने मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेमध्ये अधिकृत फेरीवाल्यांवरही अन्याय होत असल्याप्रकरणी सत्तेतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी खासदार संजय निरुपम यांनी सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली. तसेच मुंबईत बांगलादेशी घुसखोर फेरीवाल्यांच्या नावाखाली स्थानिक मराठी फेरीवाल्यांना जाणीवपूर्व लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी यावेळी केला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाला अद्याप एकही बांगलादेशी फेरीवाला शोधता आलेला नाही, असा दावाही निरुपम यांंनी यावेळी केला.

संजय निरुपम हे अजिबात चुकीचे बोललेले नाहीत, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली. आधी ‘जय श्रीराम’चा नारा देऊन उत्तर भारतीयांची मते घेतली. आता उत्तर भारतीय फेरीवाल्यांवर कारवाई करतात. म्हणून संजय निरुपम यांनी भाजपचा भोपळा फोडला आहे. मित्राला फोडून सोबत घेतलेल्या पक्षाला तुमच्यावर विश्वास नाही, असाही टोला त्यांनी भाजपला लगावला. शंभर दिवसांच्या कामांची यादी देणाऱ्या भाजपच्या भ्रमाचा भोपळा त्यांच्या मित्रपक्षानेच फोडला आहे, असाही टोला पेडणेकर यांनी लगावला.

मुसलमानांवर इतका राग आहे तर…

मुस्लिम फेरीवाल्यांवर बांगलादेशी म्हणून कारवाई केली जात आहे. मुसलमानांवर इतका राग आहे, तर एमआयएमला तीन तीन कोटी रुपये निधी का दिला, असाही सवाल पेडणेकर यांनी केला. मराठी माणसांच्या प्रभागात निधी दिला नाही. इकडे साटेलोटे करायचे आणि उगाच गोरगरीब लोकांच्या पोटावर पाय आणायचा, अशी टीका पेडणेकर यांनी केली.

पंतप्रधानांच्या नावाने लोकसभा निवडणुकीच्या आधी फेरीवाल्यांना कर्ज दिले, त्यात मुस्लिम फेरीवाल्यांचाही समावेश होता. मग हे रोहिंगे आहेत हे तेव्हा कळले नाही का, असाही खोचक सवाल पेडणेकर यांनी केला.

काल काय केले ते आज विसरायचे, आज काय केले ते उद्या विसरायचे, कर्ज घेणाऱ्यांमध्ये मुस्लिम फेरीवालेही आहेत. मग त्यांना कर्ज का दिले. तेव्हाच का तपासणी केली नाही, असाही सवाल त्यांनी केला.