मुंबई: एका बाजूला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेद्वारे फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य दिले जात असून आणि त्यांना स्वावलंबी व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे मुंबईत भाजपचे लोकप्रतिनिधी फेरीवाल्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करीत असल्याचा आरोप आझाद हॉकर्स युनियनने केला आहे. फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर असल्याचे भाजपच्या लोकप्रतिनिधींचे वाक्य फेरीवाला संघटनेला अजिबात आवडलेले नाही. त्यामुळे युनियनने भाजपच्या दोन लोकप्रतिनिधींची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबई महापालिकेच्या वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांचा विषय गाजतो आहे. मुंबई महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर लगेचच महापौर रितू तावडे यांनी बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

येत्या काही दिवसांत फेरीवाल्यांना क्यू आर कोड ओळखपत्र दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात स्थायी समितीमध्ये भाजपचे नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी फेरीवाल्यांना सरसकट ओळखपत्र देऊ नये अशी मागणी केली. पोलिस पडताळणी केल्याशिवाय ओळखपत्र देऊ नये अशीही सूचना त्यांनी दिली. या सूचनेवर आझाद हॉकर्स युनियनने आक्षेप घेतला आहे. महासचिव तथा नगर पथविक्रेता समितीचे नवनिर्वाचित सदस्य जयशंकर दयाशंकर सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करून काही लोकप्रतिनिधींनी फेरीवाल्यांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

फेरीवाले हे मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग असून लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या वक्तव्यांबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण द्यावे, फेरीवाल्यांच्या भावना दुखावणारी विधाने मागे घ्यावीत आणि या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे.

तिवाना यांनी फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय व्यक्त करून सर्व फेरीवाल्यांना संशयाच्या भोवऱ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच फेरीवाल्यांचा संबंध दहशतवादी कारवायांशी जोडला जाऊ शकतो, असे सूचित करणारी विधानेही केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एका बाजूला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेद्वारे फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे आणि त्यांना स्वावलंबी व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विविध प्रसंगी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लघुउद्योजकांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. अशा परिस्थितीत फेरीवाल्यांविरोधात करण्यात येणारी आक्षेपार्ह विधाने दुर्दैवी असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

आमदार संजय उपाध्याय यांचीही तक्रार …

बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी फेरीवाले आणि भिकारी यांच्याविरोधात आंदोलनात्मक भूमिका घेतल्याबाबतही सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फेरीवाले आणि भिकारी यांना एकाच वर्गात जोखणे हे लाखो कष्टकरी फेरीवाल्यांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फेरीवाले हे कायदेशीररित्या व्यवसाय करणारे नागरिक असून त्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.