Mumbai Submerged Climate Change UN Report: समुद्राच्या पाणीपातळीचा स्तर वाढत असल्यामुळे दक्षिण आशियातील अनेक शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापैकी मुंबई हे एक शहर असल्याचे सांगितले जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका नव्या अहवालानुसार, किनारी भागात राहणाऱ्या १.४ कोटी लोकांना पाणी पातळी वाढल्याचा फटका बसू शकतो. ज्यामुळे त्यांच्या विस्थापनाचा धोका निर्माण झाला आहे.

३१ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत “चॅलेंजेस रिलेटेड टू सी लेव्हल राईज अँड वेज अँड ॲप्रोचेस टू ॲड्रेस” हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात मुंबई, कोलकाता आणि ढाका या शहरांचा उल्लेख करण्यात आला आहे. वाढत्या समुद्र पातळीमुळे शहरांना आर्थिक नुकसानासह मोठ्या प्रमाणात मानवी विस्थापनाच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असे त्यात नमूद केले आहे.

२०१४ नंतर समुद्राच्या पातळीत सातत्याने वाढ

या अहवालानुसार, २०२४ मध्ये समुद्राच्या पातळीत ५.९ मिमीच्या विक्रमी दराने वाढ झाली. त्यापूर्वी २०१४ ते २०२३ या काळात ४.७ मिमीच्या सरासरीने दरवर्षी समुद्र पातळीत वाढ झाली होती.

अहवालात नमूद केल्यानुसार, उत्सर्जन कमी करण्यासाठी आतापासून आक्रमक पावले उचलली तरी २१०० पर्यंत जागतिक समुद्र पातळी कमीत कमी ०.५ मीटरने वाढू शकते. पश्चिम अंटार्क्टिकातील बर्फाच्या आवरणाची सर्वात वाईट परिस्थिती ओढवली तर समुद्र पातळीत दोन मीटरपर्यंत वाढ होऊ शकते. ज्यामुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये अत्यंत गंभीर घटना घडू शकतात.

दक्षिण आशियातील काही सखल त्रिभुज प्रदेशातील शहरे जसे की, कोलकाता, मुंबई आणि बांगलादेशमधील ढाकामध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी वस्तीचे विस्थापन करावे लागू शकते. ज्यामुळे १.४ कोटी लोकांना त्याचा फटका बसू शकतो. शहरे पाण्याखाली गेल्यामुळे येथील लोकांना कायमस्वरुपी आपले घर गमवावे लागू शकते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Mumbai Submerged Climate Change UN Report updates
समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे दक्षिण आशियातील किनारी भागांना मोठा फटका बसणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राच्या (UN) ताज्या अहवालात देण्यात आला आहे. (Image: Amit Chakravarty)

मुंबईत भूस्खलन आणि खारे पाणी घुसण्याचा धोका

मुंबईसाठी मोठा धोका असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कारण शहरात भूस्खलन आणि समुद्राचे खारे पाणी शहरात शिरल्यामुळे मोठी हानी होऊ शकते. यामुळे किनारी भागातील भूजल स्त्रोत आणि विहिरी दूषित होऊ शकतात. समुद्रातून उठणाऱ्या मोठ्या लाटांमुळे स्वच्छता व्यवस्था, गृहसंकूल आणि वाहतूक व्यवस्था यासारख्या पायाभूत सुविधांवर दबाव येऊ शकतो.

८० टक्के भाग पाण्याखाली येऊ शकतो?

संयुक्त राष्ट्रांचे मूल्यांकन हे मुंबई महानगरपालिकेने २०२१ साली प्रसिद्ध केलेल्या मुंबईच्या हवामान कृती योजनेतील इशाऱ्याशी मिळतेजुळते आहे. या योजनेनुसार, २०५० पर्यंत मुंबईचा ८० टक्के भाग पाण्याखाली जाऊ शकतो. तसेच पुढील तीन दशकांत मुंबई आणि भारतातील इतर ११ किनारी शहरांमध्ये समुद्राची पातळी ०.१ ते ०.३ मीटरने वाढण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला होता.

मुंबई तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेली

मेरीलँड विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक आणि आयआयटी मुंबईचे अभ्यागत प्राध्यापक, हवामान शास्त्रज्ञ रघु मुर्तुगुड्डे यांच्या विधानाचा हवाला द इंडियन एक्सप्रेसने दिला आहे. शास्त्रज्ञ रघु मुर्तुगुड्डे म्हणाले की, मुंबई तीन बाजूंनी समुद्राने वेढलेली आहे. मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे आणि बदलत्या हवामानामुळे धोका वाढला आहे.