मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून यामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. याचा फटका भटके प्राणी आणि पक्ष्यांनाही बसत असून काही जखमी पक्ष्यांवर मुंबईतील परळ येथील दि बाई साकरबाई दिनशॉ पेटिट पशु रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यंदा उष्णतेचा सर्वाधिक त्रास पक्ष्यांना होत असून यात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यंदा हवामानात झपाट्याने बदल होत असून यामुळे उष्णतेत वाढ झाली आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाटेसदृश्य स्थितीची नोंद होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचे चटके सहन करावे लागत असून याचा सर्वाधिक फटका आता पक्षी आणि भटक्या प्राण्यांना बसत आहे. यात श्वान आणि मांजरी यांचा समावेश असून पक्षी जखमी होऊन रस्त्यातच पडण्याचे, तसेच काही पक्षी उष्माघाताने दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबईतील परळ येथे अशा जखमी आणि उष्माघाताचा फटका बसलेल्या पक्ष्यांवर आणि प्राण्यांवर उपचार केले जातात. मागील काही दिवसात येथे सर्वाधिक पक्ष्यांवर उपचार करण्यात आले असून त्यातून वाचलेल्या पक्ष्यांना सुरक्षितपणे त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यात आले, अशी माहिती दि बाई साकरबाई दिनशॉ पेटिट रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर दिली.

यंदा पक्ष्यांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसताना दिसत असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा उष्णतेचा त्रास झालेल्या पक्ष्यांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात उष्णतेचा गंभीर त्रास होऊन दगावणाऱ्या पक्ष्यांची संख्या ३० टक्के आहे. श्वानांनाही उष्माघाताच फटका बसतो आहे. दरवर्षी उष्णतेचा त्रास होणाऱ्या पक्ष्यांमध्ये कबुतर, कावळा आणि घारी यांची संख्या सर्वाधिक असते. – डॉ. मयूर डांगर, व्यवस्थापक, दि बाई साकरबाई दिनशॉ पेटिट पशु रुग्णालय

मे महिन्यातील उष्णतेच फटका बसेलले पक्षी आणि प्राणी

कबुतर – ३७

पोपट – ७

कावळे – १५

घुबड – ८

घार – ३०

श्वान – १५

मांजरी – ७

प्राणी – पक्ष्यांसाठी जलसेवा

मुंबईतील ‘स्नाउट-क्लाउट’ या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेकडून भटके प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी ‘पानी फॉर प्राणी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महामुंबई प्रदेशातील भटके प्राणी आणि पक्षी यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा या तरुणांनी सुरू केलेल्या संस्थेचा उद्देश आहे. या संस्थेकडून आतापर्यंत ५०० हून अधिक सिमेंटच्या पाणी ठेवण्याच्या भांड्यांचे वाटप नागरिकांना करण्यात आले आहे. मुंबईत काँक्रीटचे जंगल वाढत असून वाढत्या उष्णतेमुळे भटके प्राणी आणि पक्षी यांना पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येत आहे, असे या संस्थेचे संस्थापक सिद्धांत राव यांनी सांगितले.