मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे कायमच नागरिक आणि पर्यटकांमुळे गजबजलेले असतात. मात्र, सध्या मुंबईतील काही समुद्रकिनारी रात्रीच्या वेळी शेकडो नागरिक झोपण्यासाठी येत असल्याचे मागील काही दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे हा मुद्दा सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे. समुद्रकिनारी रात्रीच्या वेळी यापूर्वी इतक्या नागरिकांनी गर्दी केली नव्हते असे निरीक्षण काही नेटकऱ्यांनी नोंदविले आहे. मात्र, हे नागरिक आपल्या कुटुंबासह समुद्रकिनारी झोण्यासाठी का येत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
वर्सोवा हा मुंबईतील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. तेथे कायम नागरिकांची गर्दी असते. मात्र, याच किनाऱ्यावर सध्या रात्रीच्या वेळी नागरिक झोण्यासाठी म्हणून अंथरूण -पांघरूण घेऊन गर्दी करताना दिसत आहेत. अक्षरशः संपूर्ण किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी नागरिक दाटीवाटीने झोपलेले दिसून येत आहेत. मुंबईतील वाढती उष्णता, लांबलेला मान्सून तसेच रात्रीच्या वेळीही उकाड्यात झालेली वाढ त्यामुळे हे नागरिक उकाड्यापासून दिलासा मिळवा यासाठी समुद्रकिनारी झोपण्यासाठी येत आहेत हे यामागचे एक कारण असावे असे बोलले जात आहे.
हवामान बदलाचे परिणाम तीव्र
मुंबईत यंदा हवामान बदलाचे परिणाम तीव्र होताना दिसत आहे. शहरात आणि उपनगरात मागील काही काळापासून उष्ण आणि दमट वातावरण कायम असून तापमानाचा पारा ३५ अशांवर स्थिर आहे. त्यामुळे दिवसा नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. मात्र, सध्या मुंबईकरांना रात्रीच्या वेळीही उष्णतेपासून दिलासा मिळत नाही.
गेल्या आठवड्यात मागील ५७ वर्षातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे झाली होती. तेथे ३०.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, आजही सांताक्रूझ आणि कुलाबा येथे २९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
मुंबईत मान्सूनचे आगमन कधी ?
मुंबईत यंदा जून महिन्याचा पंधरवडा कोरडाच गेला. या दरम्यान सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे आता मुंबईकरांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. राज्यात सध्या पावसाची नोंद तुरळक ठिकणी होत आहे. पुढील काही दिवसात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान अनुकूल होण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे. तसेच राज्याच्या कोकणकिनारपट्टीवर (मुंबईसह) २४-२५ जूनच्या आसपास पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज आहे.
