मुंबई : मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानता आणि खराब हवामानामुळे बुधवारी मुंबई विमानतळाच्या हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या तीन विमानांना नवी मुंबई, सुरत आणि ओझर विमानतळाकडे वळवावी लागली. इतर विमानतळांवर वळवलेली तिन्ही विमाने परत मुंबई विमानतळावर आली.
मुंबई शहर आणि उपनगरात बुधवार पहाटेपासून जोरदार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसामुळे विमान उड्डाणांवर आणि लँडिंगवर थेट परिणाम होतो. खराब हवामानामुळे कमी दृश्यमानता आणि धावपट्टी निसरडी झाल्याने विमानांना ”गो-अराऊंड” (आकाशातच फेऱ्या मारणे) किंवा इतर विमानतळांवर विमाने वळवावी लागतात. यामुळे विमानांचे आगमन आणि प्रस्थान विलंबाने झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
खराब हवामानामुळे उड्डाणांना उशीर होत असून प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले. मुंबई विमानतळावरून अनेक उड्डाणे उशिरा झाली. मुसळधार पावसामुळे आज ३ विमाने इतर विमानतळांवर वळवली होती. यात इंडिगोच्या दोन तर एअर इंडियाच्या एका विमानाचा समावेश होता. ६ ई-५२३७ बंगळुरु-मुंबई विमान नवी मुंबई विमानतळावर, एआय-२७८८ कोचीन-मुंबई विमान सुरत विमानतळाकडे तर ६ ई-६१४५ नागपुर-मुंबई विमान ओझर विमानतळाकडे वळविले होते.
विमानतळ आणि आसपासच्या भागात पाणी साचल्यामुळे विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानतळावर जादा वेळ घेऊन लवकर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्या संबंधित विमान कंपनीच्या ॲप किंवा मुंबई विमानतळाच्या संकेतस्थळावरून विमानांच्या वेळांची खात्री करून घेण्याचा सल्ला दिला आहे.
