मुंबई : मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असली तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचे पाणलोट क्षेत्र अद्यापही कोरडेच आहे. सद्य:स्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा ७.९४ टक्क्यांवर आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुढील काही दिवसांत पावसाने जोर न धरल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गतवर्षी याच दिवसांत धरणात तब्बल ३२.८९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईत पावसाचे आगमन झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. एल निनोच्या संकटामुळे यंदा मुंबईकर मोठ्या चिंतेत आहेत.
अशातच पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांसह प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले होते. महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून १५ मे पासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. अशातच पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही १७ जूनपासून मर्यादा घालण्यात आल्या आहेत. औद्योगिक व व्यापारी तसेच, स्पोर्ट्स क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात लागू करण्यात आली आहे. मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी साधारण ३९०० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ इतकी आहे. मात्र, सद्य:स्थितीत सातही धरणात मिळून केवळ १ लाख १४ हजार ८६३ दशलक्ष लिटर (७.९४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेला पाणीसाठा मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकत आहे.
पावसाळा लांबल्याने उपलब्ध पाणीसाठा अधिकाधिक काळ पुरविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. मुंबईत मंगळवार, बुधवारी झालेल्या पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्यास मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या मंजुरीनंतर आता ऊर्ध्व वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा वापरण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. ऊर्ध्व वैतरणामध्ये ००, मोडकसागरमध्ये २०.४६ टक्के , तानसामध्ये १.८५ टक्के, मध्य वैतरणात १०.९८ टक्के, भातसामध्ये ७.१ टक्के, विहारमध्ये ४५.१३ टक्के, तर तुळशी तलावात २२.२ टक्के इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. तीन वर्षातील २४ जून रोजीचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये) २०२६ – ११४८६३ (७.९४ टक्के) २०२५ – ४७६०९८ (३२.८९ टक्के)२०२४ – ७६७१४ (५.३० टक्के)
