मुंबई : मुंबईसह परिसरात हवामान विभागाने अतिवृष्टीचा ‘हाय अलर्ट’ जारी केल्याने महाराष्ट्र विधान परिषदेचे कामकाज गुरुवारी नियोजित वेळेपूर्वीच तहकूब करण्यात आले. रात्री ११ वाजेपर्यंत कामकाज चालवणार होते पण सायंकाळी ७.०५ वाजता स्थगित करण्यात आले. त्यामुळे जवळपास चार तास आधीच सभागृहाचे कामकाज आवरते घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सभागृहात कामगार संहिता विषयावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे आमदार भाई जगताप आपले भाषण करत होते. त्याचवेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी हस्तक्षेप करत मुंबईत हवामान विभागाने ‘हाय अलर्ट’ दिल्याची माहिती सभागृहाला दिली. सायंकाळी ६.३९ वाजल्यापासून अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने आमदार, अधिकारी आणि विधानमंडळ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सभागृहाचे कामकाज आवरते घेण्याची विनंती त्यांनी केली.

या सूचनेची दखल घेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सर्व पक्षांच्या सदस्यांशी चर्चा करून कामकाज सायंकाळी ७.०५ वाजता तहकूब करण्याची घोषणा केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या चर्चा आणि प्रलंबित कामकाज पुढे ढकलण्यात आले.

सभापतींनी यावेळी जाहीर केले की, तहकूब करण्यात आलेले उर्वरित कामकाज पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी १० वाजता विधान परिषदेची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रलंबित विधेयके, चर्चा आणि इतर शासकीय कामकाज हाती घेण्यात येणार आहे.

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विधान परिषदेचे कामकाज वेळेआधीच स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजावर थेट परिणाम झाल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले.