मुंबई : यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जून महिन्यात शेतीची कामे केली जातात. परंतु पावसाने दडी मारल्याने आणि त्यातच राज्यात जांभूळाचा सडा मोठ्या प्रमाणात पडल्याने यंदा राज्यात दुष्काळ पडणार अशी चर्चा सुरु झाली. या चर्चेवर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसह काही हवामान तज्ज्ञांनी मोहोर उठविल्याने यंदा दुष्काळ पडणार हे जवळ-जवळ सर्वांनीच मान्य केले. मात्र जुलै महिना उजाडताच राज्यात पावसाने जोरदार मुसंडी मारून सगळीकडे पाणीच-पाणी केले. यातच सोमवारी मुंबईतील मुसळधार पावसामुळे जांभळाचे झाड पडले. जांभळाचे झाड पडल्याने सोशल मिडियात मिम्सचा पाऊस पडला आहे.

निसर्ग नियमाप्रमाणे जून महिन्यात पावसाची सुरुवात व्हायला हवी. यंदाही जून महिन्यात पावसाने ओढ दिली. यंदाच्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जांभळे बाजारात आली होती. जांभळे जास्त आली म्हणजे आता पाऊस कमी पडणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्या खऱया ठरतात की काय अशीच परिस्थिती जूनच्या महिन्यात दिसत होती. मात्र जुलै महिना सुरू झाला आणि मुंबई आणि कोकणीत पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ज्यावर्षी जांभळे जास्त येतात तेव्हा कोरडा नाही परंतु ओला दुष्काळ पडतोय की काय? अशी स्थिती पहायला मिळतेय. सगळीकडेच पाणीच-पाणी झालेय, असे म्हणत मिम्स व्हायरल होत आहेत.

मुंबईतील एन.एम. जोशी मार्गावरील भवानी माता सोसायटीमध्ये चक्क जांभळाचे भलेमोठे झाड, जोराचा वारा आणि पावसामुळे पडले आहे. रविवारी सकाळी झालेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महापालिकेने झाडाची छाटणी व कटींग केले. दरम्यान जांभूळ फळे जास्त लागण्याचा आणि पावसाचा किंवा दुष्काळाचा काहीही संबंध नसतो, हेच सांगण्याचा प्रयत्न मिम्समधून होत आहे. राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि हिंदी-मराठी सिनेमातील संवाद घेऊन हे मिम्स व्हायरल होत आहेत.

नाना पाटेकर यांच्या देऊळ सिनेमातील इकडं ये रे जांभळीच्या, तसेच प्रवीण तरडेंच्या मुळशी पॅटर्न सिनेमातील काही प्रसंगांवरूनही मिम्स बनवले आहेत. सध्या पाऊस जांभळाच्या झाडाला हसत सांगतोय, कैसा फसाया… अशा आशयाचे एक मिम नगरसेविका सहर शेख यांचे छायाचित्र वापरूनही मिम तयार केले आहे. अभिनेता मनोज वाजपेयी आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या गँग्ज ऑफ वासेपूर सिनेमातील काही प्रसंगांवरूनही जांभळाचे मिम्स बनले आहेत. ठाकरेंच्या मेळाव्यात भाषण करणारे कवि नितीन चंदनशिवे यांच्या कवितेवरुनही मग पावसाने जांभळाच्या झाडाला असा तुडवला, असा तुडवला,असा तुडवला…, जांभळाचे शाप भोवले… जांभळाची जाहीर माफी मागेपर्यंत थांबतच नसतोय… अशी मिम्स प्रसारित होत आहेत. वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर हे मिम्स प्रसारित होत असून नेटीझन्सही पावसात मिम्सचा आनंद घेत आहेत.

हवामान खात्याचे अंदाज

हवामान खात्याचा अंदाज हा नेहमीच हे सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरतो. मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे बहुतांश वेळा सरकार शाळा, शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करते. त्या दिवशी लख्ख ऊन पडलेले असते. तंत्रज्ञानामुळे हवामान खाते अधिक सक्षम झाले असले तरी हवामानाचे अंदाज आजही काही वेळा चुकतात. हवामान बदलांचे आव्हान असतानाही भारतीय हवामान विभाग काही तासांपूर्वी पावसाचा नेमका अंदाज वर्तवू लागले आहे. याचा प्रत्यय आठवड्याच्या सुरुवातीपासून मुंबईकरांना आला आहे.

हवामान खात्याकडून अतिवृष्टी, वादळ, उष्णतेची तीव्र लाट याची तंतोतंत माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. मात्र, हवामानाचे अंदाज हा अजूनही चेष्टेचा विषय आहे. यंदा दुष्काळ सदृश स्थितीचा, जुलै महिन्यातही कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात चारच दिवसात जुलै महिन्याच्या सरासरीइतका पाऊस मुंबईत झाला आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीचा इशारा दिला की मुंबईत कडकडीत ऊन पडल्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे.

१०० किलो साखरेचे पोते

हवामान खात्याला हवामान खात्याचा पावसाचा अंदाज २०१७ मध्ये चुकला होता. त्यावरून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी “हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी हवामानतज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, ” असा उपरोधिक टोला लगावला होता. मात्र नंतर अंदाज बरोबर ठरला आणि शरद पवार यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये हवामान विभागाच्या पुणे कार्यालयात खास बारामतीवरून १०० किलो साखरेचे पोते पाठवले होते.