मुंबई : मुंबई आणि उपनगरांसह घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. भूस्खलन, रुळांखालची खडी वाहून जाणे आणि रेल्वे मार्गांवर पाणी साचल्याने अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा उशिराने धावत आहेत. तर, कर्जत – खोपोली लोकल सेवा बंद करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या कर्जत–लोणावळा दक्षिण-पूर्व घाट विभागात ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिन दरम्यान मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. तसेच खंडाळा–मंकी हिलदरम्यान मध्य मार्गावरही दरड कोसळल्याने तिन्ही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक मेल-एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वेगाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत तर काहींच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
याचदरम्यान, मुसळधार पावसामुळे कर्जत ते खोपोली मार्गावर रेल्वे रुळांखालचा खडी (बॅलेस्ट) वाहून गेल्याने या मार्गावरील लोकल सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. दक्ष कर्मचाऱ्यांनी वेळेत ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सुरक्षेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. रेल्वे अभियंते आणि देखभाल पथके घटनास्थळी पोहचून मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.
पश्चिम रेल्वेही संथ
पश्चिम रेल्वेवरही मुसळधार पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. विरार ते नालासोपारा आणि वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरार ते नालासोपारा दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा प्रभावित झाल्याने लोकल जलद मार्गावरून चालविण्यात येत आहेत. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या लोकल सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन तासांत पालघर परिसरात सुमारे ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचे पाणी वसई–विरार परिसराकडे वाहून येत असल्याने रेल्वे मार्ग आणि स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शहरातील नाले आणि गटारे ओसंडून वाहत असून नालासोपारा शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गावरील पाणी बाहेर जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले असून अतिरिक्त प्रवास वेळ गृहीत धरून नियोजन करण्यास सांगितले आहे.
रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल
- गाडी क्रमांक ०५१८४ वांद्रे टर्मिनस ते आझमगड एक्स्प्रेस ०६ जुलै रोजी सकाळी १०.४५ वाजता सुटणारी रेल्वेगाडी आता दुपारी १.४५ वाजता सुटेल.
- गाडी क्रमांक ०९७०६ वांद्रे टर्मिनस ते जयपूर एक्स्प्रेस ०६ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता सुटणारी रेल्वेगाडी आता सायंकाळी ५.१० वाजता सुटेल.
