मुंबई : मुंबईत आठवडाभर सुरू असलेल्या पावसाची तीव्रता शनिवारी वाढल्याने त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला. सखल भागात पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन काही भागातील वाहतूक संथ गतीने सुरू होती. अनेक भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या, तसेच मुसळधार पावसामुळे उपनगरीय लोकल सेवेवरही परिणाम झाला होता. त्यामुळे मुंबईकरांना शनिवारी विविध समस्यांचा सामना करावा लागला. दरम्यान, काही भागात सहा तासात १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली तर मुंबईत अवघ्या तीन दिवसांत जुलैमधील एकूण सरासरीच्या ६० टक्के पावसाची नोंद झाली.
मागील काही दिवसांपासून कोकण प्रदेशात पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी शनिवारी पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. या प्रदेशांतील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला होता. काही तासातच पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणचे सखल भाग पाण्याखाली गेले.
उपनगरात मुसळधार पावसाची नोंद झाली. सकाळी ८ ते संध्याकाळी ४ पर्यंत शहारत ४७ मिमी, पूर्व उपनगरात १२५ मिमी तर पश्चिम उपनगरात १११ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान आजही हवामान विभागाकडून मुंबईला मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. मंगळावरपासून मुंबईत पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तीन दिवसात मुंबई शहरात ४२९.८ मिमी, तर उपनरांमध्ये ५१२.३ मिमी पावसाची नोंद झाली असून ती जुलैमधील एकूण सरासरी पावसाच्या ६० टक्के इतकी आहे.
शनिवारी सहा तासात नोंदला गेलेला पाऊस
विक्रोळी – १६४ मिमी
राम मंदिर – १४८ मिमी
सांताक्रूझ – १२६.९ मिमी
विद्याविहार – १०२ मिमी
वांद्रे – ७२.५ मिमी
शीव – ६३.५ मिमी
कुलाबा – ५३.४ मिमी
भायखळा – ३४.५ मिमी
—
