मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला शनिवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपले. उपनगरात अनेक ठिकाणी दुपारपर्यंत दीडशे मिमी पावसाची नोंद झाली. दुपारी पावणेतीन वाजता समुद्राला मोठी भरती आल्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवावे लागले. बेस्ट बसची वाहतूक वळवावी लागली. शहरात अनेक ठिकाणी झाडे पडली व त्यामुळे वाहतूक वळवावी लागली. अतिमुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेने दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. गोवंडीत एक घर पडल्यामुळे दोन जण जखमी झाले. तर भांडुपमध्ये रस्ता खचल्यामुळे रस्त्यावरील झाडे आणि एक टेम्पोही खोल खड्ड्यात गेले.

मुंबई महापालिकेचे १० हजाराहून अधिक कर्मचारी तैनात

मुसळधार पावसामुळे महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत होती. महानगरपालिकेचे १० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी विविध भागांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रावर तैनात होते. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, महापौर रितू तावडे यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत होत्या. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे आणि अन्य अधिकारी आपात्कालीन कक्षात उपस्थित होते.

सर्व विभागप्रमुख, अभियंते, पंपचालक, आरोग्य कर्मचारी तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत असून पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा तरंगता घनकचरा, झाडांच्या फांद्या तसेच इतर कचरा मॅनहोल किंवा नाल्यांमध्ये अडकून पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी कर्मचारी सातत्याने सेवा बजावत होते.

रविवारीही रेड अलर्ट

भारतीय हवामान विभागाने रविवार, ५ जुलै २०२६ रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला असून आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. नागरिकांनाही आवश्यकता नसल्यास पावसादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच रविवारी दुपारी ३.२२ वाजता समुद्राला भरती येणार असून यावेळी ४.१९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

शाळांना सुटी

भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर शनिवारी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील सर्व खासगी / सरकारी शाळा व महाविद्यालयांना शनिवारी दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली होती.

लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंधासाठी खबरदारी

पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंधासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

पावसाचे पाणी उपसण्यासाठी मुंबईत ५४७ पंप बसवण्यात आले असून शनिवारी ४४८ उदंचन संच कार्यान्वित करण्यात आले होते. हे उदंचन संच चालवण्यासाठी प्रशिक्षित पंपचालक प्रत्यक्ष ठिकाणी तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर १९ छोटे उदंचन केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते.

नागरिकांना आवाहन

नागरिकांनी पाणी साचलेल्या रस्त्यांवरून अथवा उघड्या नाल्यांच्या परिसरातून जाणे टाळावे, विद्युत खांब, तुटलेल्या तारा किंवा धोकादायक झाडांच्या परिसरापासून दूर राहावे, तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती अथवा धोका निदर्शनास आल्यास तात्काळ महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष अथवा संबंधित विभाग (वॉर्ड) कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

गोवंडीत घर पडले

गोवंडीतील बैंगनवाडी येथे जी लाईन रोड नं १० येथे दुपारी दीड वाजता एक मजली घर पडले. या दुर्घटनेत एक महिला व एक पुरुष जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

धरणसाठ्यात वाढ

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात पावसामुळे चांगलीच वाढ झाली आहे. साडेसहा टक्क्यापर्यंत गेलेला पाणीसाठा दोन – तीन दिवसांतील पावसामुळे चांगलाच वाढला आहे. शनिवारी सकाळी उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून ९.४१ टक्के पाणीसाठी जमा झाला. शनिवारच्या पावसामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.