मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिलेली असली तरी मंगळवारपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारी चांगला वाढला होता. दिवसभर संपूर्ण मुंबईत सुर्यदर्शन होऊ शकले नाही. पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. सर्वाधिक पाऊस सांताक्रूझ परिसरात पडला. त्याखालोखाल अंधेरी, पवई, विक्रोळी परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. काही भागत १२० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. अंधेरी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे अंधेरी सबवे बंद करावा लागला होता.
मंगळवारी रात्रीपासून ९० ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याच्या तक्रारी आल्या. तर वाळकेश्वरमध्ये इमारतीचा भाग पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर कुर्लामध्ये दरड कोसळल्यामुळे दोन कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. तर दोन दिवसांच्या पावसामुळे पवई तलावही भरून वाहू लागला.
वाळकेश्वरमध्ये इमारतीचा भाग पडून एक मृत्यू
दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील सुर्यप्रकाश इमारतीत मंगळवारी रात्री एक दुर्घटना घडली. तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीचा भाग कोसळला. ही म्हाडाची उपकरप्राप्त इमारत असून अतिशय जीर्ण झाली होती. या इमारतीचा भाग कोसळला तेव्हा जवळच्या पेट्रोलपंपावर काम करणारे संतोष बारस्कर (५१) हे त्यात जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जे जे रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कुर्ल्यात दरड कोसळली
मंगळवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. मंगळवारी रात्री १० वाजता कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्गावरील अंबर बिल्डिंगच्या मागे असलेल्या बुद्ध वसाहतीसमोर डोंगराळ भागावरून दगड व माती खाली घसरत आली. यावेळी एल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता संरक्षक भिंतीच्या वर राहणाऱ्या कुटुंबांना धोका होता. या ठिकाणच्या सहा कुटुंबांपैकी पाच कुटुंबांनी यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर केले होते. तर उर्वरित एका कुटुंबामध्ये एक दिव्यांग व्यक्ती राहत होता.
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या कुटुंबाला तसेच संरक्षक भिंतीच्या पायथ्याशी राहणाऱ्या दोन कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. या घटनेत जिवितहानीची नोंद आहे.
मरोळमध्ये झाड पडले
चेंबूरमध्ये मंगळवारी शाळेच्या बसवर झाड पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारीही मरोळमध्ये एका चारचाकी गाडीवर झाड पडले. अंधेरीतील मरोळ मिलिटरी रोड परिसरात मंगळवारी रात्री मुसळधार पावसादरम्यान एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. एका वाहनावर हे झाड पडले होते. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. तर बुधवारी सकाळी अंधेरी परिसरात एस व्ही रोड वर झाड पडले. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबा झाला होता.
