मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसात सत्ताधारी महायुतीपैकी शिवसेना (शिंदे) पक्ष हा भाजपपेक्षा सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात शिवसेना (शिंदे) पक्षाने आपल्या सगळ्या नगरसेवकांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिवसेनेचे नगरसेवक रस्त्यावर उतरले होते. मात्र लागोपाठ झालेल्या दोन दुर्घटनांनंतर भाजपपेक्षा शिवसेनेचे नगरसेवक रस्त्यावर आणि पालिका मुख्यालयातही हजर होते.

मुंबईत मंगळवार, ३० जूनपासून पाऊस पडत असून ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. तसेच विविध ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडत आहेत. त्यातच मंगळवारी शाळेच्या बसवर झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर गुरुवारी एका मनुष्य प्रवेशिकेमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनावर टीका होऊ लागली आहे. पालिकेत सध्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाची सत्ता आहे. मात्र या परिस्थितीत शिवसेना (शिंदे) पक्षाने आपल्या नगरसेवकांना रस्त्यावर उतरून काम करण्याचे आदेश दिले. गुरुवारी शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी पक्षातील नगरसेवकांना रस्त्यावर उतरून आदेश दिले.

आपल्या परिसरात पाणी साचणे, झाडे पडणे, वाहतूक कोंडी, वीजपुरवठा खंडित होणे तसेच इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक ती मदत करावी, असे निर्देश घोले यांनी दिले. ज्या भागात शिवसेनेचे खासदार, आमदार किंवा नगरसेवक आहेत. त्या भागातील सर्व कामांचा समन्वय संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावा, असेही त्यांनी आपल्या नगरसेवकांनी दिले.

जिथे शिवसेनेचा लोकप्रतिनिधी नाही तिथेही जबाबदारी ….

ज्या भागात शिवसेनेचा लोकप्रतिनिधी नाही, तेथे मुंबई महानगरपालिकेशी समन्वय साधण्यासाठी नोडल जबाबदाऱ्या शिवसेनेने निश्चित केल्या आहेत. पश्चिम उपनगरासाठी उपमहापौर संजय घाडी, पूर्व उपनगरासाठी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव तर शहर विभागासाठी अमेय घोले यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. कोणतीही घटना, अडचण किंवा मदतकार्याची माहिती संबंधित नोडल प्रतिनिधींसोबत तात्काळ शेअर करून आवश्यक कार्यवाही करावी. नागरिकांच्या सेवेसाठी सर्वांनी सतर्क राहून समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश नगरसेवकांना देण्यात आले आहेत.
महापौर रितू तावडे चार तासांनी घटनास्थळी

दरम्यान, साकीनाका येथील घटना घडली त्यानंतर उपमहापौर संजय घाडी आणि प्रभाग समिती अध्यक्ष विजेंद्र शिंदे यांच्यासोबत साकीनाका खैरानी रोड येथील मॅनहोल दुर्घटनास्थळाला भेट दिली. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या देखील घटनास्थळी दुपारीच पोहोचल्या. मात्र महापौर रितू तावडे या दुपारी चार नंतर घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तर भाजपचे अन्य कोणीही पदाधिकारी घटनास्थळी गेले नव्हते.