मुंबई : मुंबईत गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणचे सखलभाग जलमय झाले आहेत. अंधेरी भुयारी मार्गासह शहरातील विविध प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांवर वाहतूक कोंडी झाल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांचे प्रचंज हाल होत आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
अंधेरी भुयारी मार्ग (डी.एन.नगर) येथे दोन फूट पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच, जामा महाल जंक्शन, बीपीटी वडाळा, कलानगर उड्डाणपूल, कमला मिल उड्डाणपूल, खेरवाडी उड्डाणपूल, अंधेरी-दिंडोशी उड्डाणपूल, जेव्हीएलआर आदी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंज मनस्ताप सहन करावा लागत आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरही वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या दोन्ही महामार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने कार्यालयीन वेळेत घराबाहेर पडलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
मुंबई महापालिकेकडून पाणी साचलेल्या भागांमध्ये पंपाद्वारे पाणी उपसण्याचे काम सुरू असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सखलभागांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून विविध ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून नागरिकांनी वाहतुकीसंदर्भातील अद्ययावत माहिती घेऊनच प्रवास करावा तसेच शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
