मुंबई : शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) मुंबईसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले आहे.

मुंबई आणि उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. तसेच, भारतीय हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. खासगी कंपन्या, आस्थापना आणि कार्यालयांनी परिस्थितीचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी. तसेच, अत्यावश्यक नसलेल्या शासकीय व निमशासकीय कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. आपत्कालीन सेवा, आरोग्य सेवा, वाहतूक आणि अन्य महत्त्वाच्या विभागांचे कामकाज मात्र नियमित सुरू राहणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ शासकीय यंत्रणांकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.