मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन (शीव) – कुर्लादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेवरील गाड्या सुमारे १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहेत. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना यामुळे मनस्तापाचा सामना करावा लागला.

मुंबई, उपनगर, ठाण्यासह राज्यभरात सोमवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला. कुर्ला- सायनदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल गाड्या खोळंबल्या. लाँग वीक एंडनंतर कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे यामुळे हाल झाले होते. कुर्ला स्थानकाजवळ सीएसटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर गाड्या खोळंबल्याने काही प्रवाशांनी ट्रॅकवरुन चालत स्टेशन गाठले.

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. दादर, हिंदमाता या भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. मुंबईच्या अन्य भागांमध्येही पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, पावसाच्या आगमनानंतर पुन्हा एकदा मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान, विदर्भ आणि कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून वर्धा येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.