मुंबई : मुंबईत शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काहीच क्षणात अनेक भाग जलमय झाले. मालाड, बोरिवली, शीव, चेंबूर, मानखुर्द आदींसह अन्य भागांमध्ये पाणी तुंबल्याचे दिसून आले. परिणामी, नागरिकांना साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागला. काही वेळ सुरु असलेल्या पावसामुळे परिसरांमध्ये पाणी साचल्याने पुन्हा एकदा नालेसफाईवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले.
पावसाळ्यात पाणी तुंबून मुंबईकरांना त्रास होऊ नये समस्येला तोंड द्यावे लागू नये यासाठी महानगरपालिकेने नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ८० टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी, तर १० टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान काढला जातो. तसेच, उर्वरित १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. मात्र, महानगरपालिकेच्या नालेसफाईवरून सातत्याने टीका केली जात आहे. यंदा पावसाळ्यापपूर्वी ९ लाख ६८ हजार ००८ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने निश्चित केले होते. त्यानुसार, निर्धारित उद्दिष्ठाच्या ८२.३१ टक्क्यांहून अधिक गाळ काढण्यात आल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे. मात्र, विरोधकांकडून याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. शहरातील मुख्य नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली असल्याचे पालिकेने घोषित केले आहे.
मात्र, असले तरीही अन्य लहान – मोठ्या नाल्यामध्ये अद्यापही कचरा व गाळ दिसून येत आहे. शनिवारी दुपारी मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही भागांमध्ये पाणी साचण्याचे दिसून आले. त्यामुळे नालेसफाईच्या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मालाड येथील मार्वे रोड, एलबीएस मार्ग, बोरिवली, ट्रॉम्ब, मानखुर्द रेल्वे स्थानक परिसर आदींसह अन्य सखल भागांमध्ये पाणी तुंबल्याचे दिसून आले. नागरिकांना साचलेल्या पाण्यातून प्रवास करताना गैरसोयींचा सामना करावा लागला. मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात पाण्याचा उपसा करणारे यंत्र कार्यान्वित करूनही पाणी साचले होते. एलबीएस मार्गावर पाणी तुंबल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ट्रॉम्बे येथील पईलियापाडा भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच, मोठे नुकसानही झाले.
दरम्यान, काही भागांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या. शहरात ४, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ६ ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. तसेच, शहरात १, पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण ५ ठिकाणी झाडे, झाडाच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.