मुंबई : मुंबईसह उत्तर कोकणातील बहुतांश भागात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, सोमवारीही पावसाची तीव्रता कायम असून अनेक भागात रात्रीपासून तुफान पाऊस सुरु असून मुंबईत आज ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे . दरम्यान, सोमवारी सकाळी १० पर्यंत हवामान विभागाकडून मुंबईसह पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला होता, मात्र, पावसाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई आणि ठाण्याला सोमवारी दिवसभरासाठी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे तर पालघर जिल्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

मान्सूनला बळ देणारी हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने सध्या मध्य भारतावर मान्सूनचा प्रभाव अधिक आहे. राज्यातील कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात पावसाचा जोर अधिक आहे. मुंबईतही वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सोमवारीही शहरात आणि उपनगरात पावसाचा जोर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहे. कामावर जाणाऱ्या नागरिकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. तसेच उपनगरीय रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, रविवारपासून शहरात आणि उपनगरात वाऱ्यांचा वेग अधिक असून झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आजही मुंबईत ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दुपारी ४ च्या दरम्यान समुद्रात ४.०८ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

पावसाची तीव्रता लक्षात घेऊन उत्तर कोकणातील बहुतांश भागात शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर कोकणात पावसाची तीव्रता अधिक आहे. अनेक भागात अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रदेशातील काही भागात जुलैमधील सरासरीच्या ५० ते ९० टक्के पावसाची नोंद मागील चार दिवसात झाली आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस कोकणप्रदेशासह घाट विभागात पावसाचा जोर अधिक राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ या वेळेत मुंबई शहरात १०५ मिमी, पूर्व उपनगरात १६१ मिमी तर पश्चिम उपनगरात १५९ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील तीन ते चार तास मुंबईसह उत्तर कोकणातील अनेक भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मंगळवारपासून मुंबईत पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.